नांदेड: एका युवक बोहल्यावर चढण्याआधीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मेंढला बुद्रूक (ता. अर्धापूर, जि. नांदेड) गावात घडली आहे. साखरपुड्याला...
नांदेड: एका युवक बोहल्यावर चढण्याआधीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मेंढला बुद्रूक (ता. अर्धापूर, जि. नांदेड) गावात घडली आहे. साखरपुड्याला आलेल्या पाहुण्यांना अंत्ययात्रेला हजेरी लावावी लागली आहे.
विशेष म्हणजे या तरुणाचा प्रेम विवाह होणार होता. वधू मुलगी देखील युवकाची नातेवाईक होती. दोन्ही कुटुंबांच्या सहमतीने प्रेम विवाह होणार होता. दोन्ही कुटुंबं आनंदी होते, पण त्यांचा हा आनंद क्षणात विरला आहे.
महेश ठाकूर असे मृत युवकाचे नाव आहे. तो हैदराबाद इथं नोकरी करत होता. येथील एका युवतीसोबत त्याचा प्रेमविवाह ठरला होता. दोन्ही कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाला संमती दिली होती. साखरपुड्याचा कार्यक्रम देखील ठरला होता. साखरपुड्याच्या कार्यक्रमाला पाहुणे मंडळी गोळा व्हायला सुरुवात झाली होती. साखरपुड्याच्या आदल्या रात्री महेश हाताला मेहंदी लावून घराच्या छतावर जाऊन झोपला होता. त्याचवेळी त्याच्या अंगावर गिझरची गरम पाण्याची टाकी उलटली. टाकीतील उकळत्या पाण्यामुळे तो ६५ टक्के भाजला. ही घटना घडताच कुटुंबीयांनी महेशला तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर नवव्या दिवशी शुक्रवारी २८ मार्चला तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
साखरपुड्याला आलेल्या पाहुण्यांना नवरदेवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. लग्न ठरलेल्या युवकाचा अशाप्रकारे साखरपुड्याच्या आदल्या दिवशी घडलेल्या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या मृत्यूने मेंढला बुद्रूक गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
COMMENTS