घोडेगाव प्रतिनिधी: सुरंजन काळे घोडेगाव (आंबेगाव) दि- २९/०३/२०२५ रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पा...
घोडेगाव प्रतिनिधी: सुरंजन काळे
घोडेगाव (आंबेगाव) दि- २९/०३/२०२५ रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सुविद्य पत्नी कै. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचा ९५ वा स्मृतिदिन संस्थेचे भिमाशंकर विद्यालय,शिनोली या शाखेत नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात तिर्थरूप कर्मवीर भाऊराव पाटील व त्यागमूर्ती सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार समर्पित करून करण्यात आली. प्रतिमापूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष दिलीपशेठ बोराडे,शाळा समिती सदस्य मधुकर बोऱ्हाडे ,राज्य पुरस्कार विजेत्या जनाबाई उगले व इतर सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
विद्यालयातील गौरी आमुंडकर, काव्या बोऱ्हाडे ,श्रेयश भवारी या विद्यार्थ्यांनी लक्ष्मी वहिनींच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. दिपाली झांजरे यांनी आपल्या भाषणातून लक्ष्मीबाई पाटील यांच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली.शाळा समिती सदस्य श्री मधुकर बोऱ्हाडे यांनी रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने या थोर महामानवांच्या जीवनकार्याचा व कर्तृत्वाचा परिचय करून दिला. अध्यक्षीय मनोगतातून दिलीप शेठ बोऱ्हाडे यांनी शालेय भौतिक सुविधांसाठी ग्रामस्थांमार्फत सर्वोतोपरी विद्यालयाला सहकार्य केले जाईल असे मत व्यक्त केले.पुरुषोत्तम फदाले ,बाजीराव शिनोलीकर यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे औचित्य साधून माजी जिल्हा परिषद सदस्य जनाबाई उगले यांना राज्य शासनामार्फत सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री पिंगळे आर एस यांनी करून दिला. कार्यक्रम प्रसंगी विद्यालयात नवनियुक्त मुख्याध्यापक श्री.अजित अभंग व पर्यवेक्षक अंजली वाळुंज यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक रूपाने मुख्याध्यापक श्री. अभंग यांनी विद्यालयाच्या भविष्यकालीन गरजांची माहिती दिली.या कार्यक्रम प्रसंगी ग्रामस्थ प्रतिनिधी गणेश बोऱ्हाडे, माजी सैनिक दामुराजे बोऱ्हाडे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ आजी-माजी विद्यार्थी,विविध शालेय समिती यांचे सन्माननीय सदस्य,महिला पालक वर्ग विविध संस्थांचे पदाधिकारी,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागप्रमुख श्री.आर.डी.गवारी यांनी केले.तर आभार प्रदर्शन प्राध्यापक ठुबे यांनी मानले. शालेय विद्यार्थ्यांच्या स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
COMMENTS