पुणे : स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणाने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध करत अनेक सा...
पुणे : स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणाने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध करत अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय नेत्यांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दत्ता गाडे याला अटक केली असून न्यायालयाने त्याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
महत्वाचे म्हणजे, या घटनेवरून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे. तसेच, विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
रुपाली ठोंबरे यांचा खळबळजनक दावा
रुपाली ठोंबरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, “या प्रकरणात संबंध संमतीने झाले होते. मात्र, आर्थिक व्यवहाराचे पैसे दिले गेले नाहीत, त्यामुळे हा वाद निर्माण झाला. यामुळे पुणे शहराची नाहक बदनामी झाली असून, त्याचा मला खेद वाटतो.” त्यांच्या याच वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
पोलिसांशी झालेल्या संवादाचा खुलासा
रुपाली ठोंबरे यांनी आपल्या पोस्टमध्ये पोलिसांशी झालेल्या चर्चेचाही उल्लेख केला आहे. त्या म्हणाल्या की, “ज्यावेळी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा DCP गिल यांनी माझ्याशी संवाद साधला. त्यांनी विचारले, ‘मॅडम, तुम्ही आंदोलन करणार असाल किंवा आरोपीला काळे फासणार असाल, तर कृपया तसे करू नका.” त्यावर मी उत्तर दिले की, मी कोणत्याही चुकीच्या गोष्टीवर आंदोलन करणार नाही. आधी संपूर्ण प्रकरण समजून घेईन आणि मगच भूमिका मांडेन.”
दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रूपाली ठोंबरे यांच्या वक्तव्यामुळे विरोधी पक्षांनी अजित पवार गटाला धारेवर धरले आहे. अनेकांनी महिला सुरक्षेसंदर्भात अशा प्रकारची विधानं करणे निषेधार्ह असल्याचे मत व्यक्त केले आहे. यासह सोशल मीडियावर देखील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.
COMMENTS