लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळवल्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सपाटून मार खावा लागला. आता या ...
लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळवल्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सपाटून मार खावा लागला. आता या सगळ्या गोष्टी मागे टाकून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आमदार, खासदार आणि पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक मुंबईमध्ये बोलवली आहे. 28 फेब्रुवारीला ही बैठक वाय बी चव्हाण सेंटरला होणार आहे. या बैठकीला शरद पवार हे स्वतः उपस्थित राहून सध्या राज्यातील राजकारणाचा आणि तसेच पक्षांतील अंतर्गत परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) मोठा पराभव झाल्यानंतर शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये ही पहिलीच मोठी बैठक होत आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून सामोरे जायचं की एकलाचलोची भूमिका घ्यायची याबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही बैठक महाविकास आघाडीचे भवितव्य ठरवणारी होऊ शकते.
विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये (NCP) संघटनात्मक बदल करण्यात यावी याची मागणी देखील जोर करत आहे. प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटील यांना देखील बदलावं अशी धुसफूस सध्या पक्षांमध्ये सुरू आहे. तसेच अनेक नेते हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या देखील वारंवार येत आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमी वर शरद पवार यांच्यासोबत असलेले अनेक स्थानिक नेते आणि पदाधिकारी देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जाऊ शकतात अशा देखील चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. पक्ष संघटनाला बळकती देऊन पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीसाठी सज्ज करण्याची जबाबदारी आता स्वतः शरद पवारांनी आपल्या खांद्यावरती घेतली असल्याचं पाहायला मिळत आहे.
COMMENTS