पुणे, दि. १६: पक्षकारांचे जीवन हे वकिलाच्या हातात असते त्यामुळे पक्षकारांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने नवीन वकिलांनी कायम ज्येष्ठ वकि...
पुणे, दि. १६: पक्षकारांचे जीवन हे वकिलाच्या हातात असते त्यामुळे पक्षकारांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने नवीन वकिलांनी कायम ज्येष्ठ वकिलांकडून न्यायाधिशांसमोर खटला मांडणी, खटला पडताळणीबाबत सतत अध्ययन करीत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी केले. 'सर्वांसाठी आणि सर्वांपर्यंत न्याय' या उद्देशाने जिथे जिथे आवश्यक आहे तेथे न्यायालयीन पायाभूत सोयी सुविधा वाढविण्यात येत आहेत, असेही त्या म्हणाल्या.
जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयाचे उद्घाटन न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे, न्यायमूर्ती आरीफ सा. डॉक्टर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे महेंद्र महाजन, आमदार शरद सोनवणे, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जुन्नर एस.एस. नायर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ॲड. ए. एच. हुसेन, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ॲड. अहमद खान पठाण, ॲड. हर्षद निंबाळकर, ॲड. विठ्ठल कोंडे-देशमुख, ॲड. राजेंद्र उमाप आदी उपस्थित होते.
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे म्हणाल्या, जनतेला न्याय मिळण्यासाठी संघर्ष करावा लागू नये यासाठी न्यायिक पायाभूत सोयी सुविधा या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. खटल्यांची वाढलेली संख्या, त्यामाध्यमातून जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास याबाबीचा विचार करुन जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. पुणे जिल्हा हा देशातील सर्वाधिक मोठा न्यायिक जिल्हा आहे. त्यामुळे आवश्यक तेथे न्यायिक पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे.
जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन झाल्यामुळे विविध प्रकारचे खटले दाखल होईल, प्रत्येक खटले पीडित व आरोपीच्यादृष्टीने महत्वाचे आहेत. त्यामुळे न्यायाधिश आणि वकील यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. न्यायालयाचा आपल्यावरील विश्वास गमावू नये यासाठी प्रत्येक खटल्याचा बारकाईने वकिलांनी अभ्यास केला पाहिजे; प्रत्येक खटल्याची पडताळणी केली पाहिजे, लोकांच्या हक्कासाठी त्यांचे रक्षक बनून त्यांचे संरक्षण करावे. खटल्याचा गांभीर्याने विचार करुन वकिलांनी न्यायालयात पुरावे सादर केले पाहिजे. नवोदित वकिलांनी वकिली करताना कठोर परिश्रम करीत राहिले पाहिजे, कायद्याचा परिपूर्ण अभ्यास करून विविध कलमाचा वापर करुन पक्षकारांना वस्तुनिष्ठपद्धतीने न्याय मिळवून दिला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.
जुन्नर येथील न्यायालयात तालुक्यातील खटले वेगाने चालून नागरिकांना वेळेत आणि गतीने न्याय मिळू शकेल. न्यायदानाला लागणारा विलंब हा न्याय नाकारण्यासारखा असतो त्यामुळे हा विलंब होऊ नये यासाठी वकिलांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे पक्षकारांना त्रास होऊ नये यासाठी वकिलांनी वारंवार सुनावणीच्या तारखा मागू नयेत, कौटुंबिक हिंसाचाराच्याबाबतीत वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करावे, याकरीता न्यायाधीशांचीही मदत घेतली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
COMMENTS