प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, बेल्हे येथील शैक्षणिक संकुला...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, बेल्हे येथील शैक्षणिक संकुलात नुकताच समर्थ सन्मान सोहळा २०२५ पार पडला.
समर्थ शैक्षणिक संकुलाच्या वतीने दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा "समर्थ सन्मान पुरस्कार" देऊन गौरव केला जातो.
या वर्षीचा समर्थ सन्मान पुरस्कार वारकरी संप्रदायातील ह.भ.प.गुरुवर्य तुळशीराम महाराज सरकटे,महाराष्ट्र राज्याच्या नियोजन व प्रक्रिया विभागाचे कृषी संचालक विनयकुमार आवटे,मेडिकल क्षेत्रातील डॉ.सदानंद राऊत व वकील क्षेत्रातील ॲडव्होकेट अतुल गुंजाळ यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
हा सन्मान मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते,दिग्दर्शक व निर्माते महेश कोठारे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
विनयकुमार आवटे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर खाते वाटप योजना,पीक विमा योजनेत सुधारणा,शेतकऱ्यांचे परदेशातील अभ्यासदौरे,जिल्हास्तरावर धान्य व फळ महोत्सवाचे आयोजन,उत्पादक ते ग्राहक अभियानांतर्गत मुंबई व इतर शहरात शेतकरी गटाद्वारे शेतमालाची थेट विक्री योजना,शेतकऱ्यांना माहिती मिळवण्यासाठी टोल फ्री नंबर अशी अनेक वैविध्यपूर्ण योजना आणि कामे केलेली आहेत.देशातील सर्वात मोठ्या वसंत कृषी प्रदर्शनाचे आयोजन तसेच सेंद्रिय शेती धोरण,आंबा व काजू बोर्डाची स्थापना,कृषीतंत्रज्ञान प्रसार कार्यक्रम,वृत्तपत्रे व कृषी विषयक माहिती मासिकात लेख,कृषीतंत्र विद्यालय व नवीन कृषी महाविद्यालयाची स्थापना,अग्रोवन मध्ये कृषी विषयक योजनांची माहिती देणारी मालिका अशा अनेक शेती विषयक योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत प्रयत्नपूर्वक पोहोचवण्याचं काम आजपर्यंत केलेले आहे.म्हणूनच समर्थ सन्मान पुरस्काराने यावेळी त्यांना सन्मानित करण्यात आले.
डॉ.सदानंद राऊत हे सर्पतज्ञ असून भारतातील सर्पदंश प्रतिबंधात्मक उपाय व उपचारांसाठी मार्गदर्शक तत्वे ठरविण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिलेला आहे.उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील रुग्णांसाठी अत्याधुनिक अतिदक्षता विभागाच्या माध्यमातून ३६ वर्ष ते रुग्णसेवा करत आहेत.शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्प राबवण्याचा त्यांचा मानस आहे.आत्तापर्यंत १२ हजारपेक्षा जास्त रुग्णांना त्यांनी जीवदान दिले आहे.आंतरराष्ट्रीय विषबाधा तज्ञांच्या परिषदेत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यु के लंडन,ऑस्ट्रेलिया,सिंगापूर, अबुधाबी,नेपाळ येथे त्यांच्या मार्फत व्याख्याने देण्यात आलेली आहेत सर्पदंश आणि त्याबाबतचे समाजातील गैरसमज व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी ते जनजागृतीचे काम करत आहेत.त्यांच्या या कार्याबद्दल समर्थ सन्मान पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.
ॲडव्होकेट अतुल गुंजाळ हे जिल्हा न्यायालय पुणे येथे वकिली व्यवसाय करत असून मोटार अपघात न्यायाधिकरण कोर्टात प्रामुख्याने कार्यरत आहेत.आत्तापर्यंत करोडो रुपयांची मदत गोरगरीब कुटुंबांना मिळवून दिलेली आहे.सन २००० पासून एसटी महामंडळाचे पुणे जिल्ह्याचे तसेच पी एम पी एम एल चे मुख्य विधी सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत पुणे जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेले आहे.नामदार हायकोर्टाने त्यांची तज्ञ मध्येस्त म्हणून नियुक्ती केलेली आहे आत्तापर्यंत ३८६ घटस्फोट प्रकरणात तडजोड घडवून सोडून गेलेल्या पत्नीस पुन्हा नांदण्यासाठी आणण्यास त्यांनी प्रवृत्त केले आहे याची दखल घेऊन सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश माननीय भूषण गवळी यांनी बेस्ट मेडिएटर इन महाराष्ट्र हे प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केलेला आहे.त्यांनी केलेल्या या कार्याबद्दल समर्थ सन्मान पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला गेला.
प्रकृती अस्वस्थ असल्याने ह.भ.प.गुरुवर्य तुळशीराम महाराज सरकटे उपस्थित राहू शकले नाही त्यांना समर्थ सन्मान पुरस्कार नंतर प्रदान करण्यात येणार आहे.
सन्मान चिन्ह,मानपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,विद्या विकास मंदिर राजुरी चे मुख्याध्यापक जी के औटी,निलेश बोरचटे,अशोक घोडके,अनिल गुंजाळ,लहू शेठ गुंजाळ अमर गुंजाळ,संतोष डौले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी मानले.
COMMENTS