अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील शेगाव तालुक्याच्या बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिराच्या सेवेकऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मंद...
अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील शेगाव तालुक्याच्या बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिराच्या सेवेकऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मंदिर परिसरातच त्यांचे शीर आणि जवळच्या विहिरीत त्यांचे धड आढळून आले आहे.
मंदिरातील सेवेकऱ्याची अशाप्रकारे हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
नामदेव दहातोंडे (वय ७०) असे हत्या झालेल्या सेवेकऱ्याचे नाव आहे. ते मागच्या १५ वर्षांपासून बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिरात सेवेकरी म्हणून काम करत होते. मंदिराची साफसफाई आणि देखरेख करण्याचं काम ते करत होते. पण मागील २६ जानेवारीपासून ते अचानक बेपत्ता झाले होते. पहिलवान बाबा मंदिराचे पुजारी एकनाथ घोरतळे यांनी पोलिस ठाण्यात सेवकरी नामदेव दहातोंडे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.
पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पण त्यांना दहातोंडे यांचा काहीच तपास लागत नव्हता. दरम्यान, मंदिर परिसरात उग्र वास यायला सुरुवात झाली होती. त्यामुळे आसपासच्या लोकांनी मंदिर परिसरात पाहणी केली असता त्यांना धड नसलेले मुंडकं आढळले. हा धक्कादायक प्रकार पाहून मंदिरातील पुजाऱ्यासह सर्वच जण घाबरले. त्यांनी तातडीनं घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, मुंडकं ताब्यात घेतले, तसेच धडाची शोधाशोध करायला सुरुवात केली.
मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या एका विहिरीत नामदेव दहातोंडे यांचे धडही आढळून आले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून मंदिरातील सेवेकऱ्याची हत्या कुणी आणि कशासाठी केली? याचा तपास पोलिस करत आहेत.
COMMENTS