नवी दिल्ली : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी (ता. 15) रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत कुंभस्नानासाठी जाणाऱ्या 18 प्रवाशांचा मृत्यू झाला ...
नवी दिल्ली : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी (ता. 15) रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत कुंभस्नानासाठी जाणाऱ्या 18 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. याशिवाय 10 जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींपैकी काही जणांची प्रकृती नाजूक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींपासून ते गृहमंत्री, संरक्षणमंत्री यांच्यासह अनेक नेत्यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून कुंभमेळ्यासाठी शनिवारी 2 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा रेल्वेकडून केली होती. आठवड्याचा शेवट असल्याने कुंभमेळ्यात स्नान करण्याच्या इच्छेने अनेकजण स्टेशनवर पोहोचले. बुकिंगसाठी तिकिटे उपलब्ध नसल्याने बहुतेक लोकांनी जनरल डब्याची तिकिटे खरेदी केली आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 14-15 वर जमू लागले. प्रयागराजला जाणारी ट्रेन तिथून सुटणार होती.
स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर एक्सप्रेस गाड्या उशिराने धावत होत्या. त्यामुळे त्यामध्ये प्रवास करणारे प्रवासीही प्लॅटफॉर्म क्रमांक 12-13 वर वाट पाहत उभे होते. यामुळे प्लॅटफॉर्मपासून पायऱ्यांपर्यंत प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. प्रयागराज एक्सप्रेस रात्री 09.30 च्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक 15 वर पोहोचली. त्यात प्रवेश करण्यासाठी लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. या धक्काबुक्कीमुळे पायऱ्यांवर उभे असलेले अनेक लोक खाली पडले आणि चिरडले गेले. धक्काबुक्कीत अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आणि गुदमरून त्यांचा मृत्यू झाला.
चेंगराचेंगरीची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्याचबरोबर जखमींना रुग्णालयात पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओंमध्ये पायऱ्यांवर बूट, चप्पल आणि कपडे विखुरलेले स्पष्ट दिसत होते. अनेक व्हिडिओंमध्ये लोक बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसत होते. मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना सरकारने मदत जाहिर केली आहे.
COMMENTS