पुणे : राज्यात एकाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गाजत असताना शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्या...
पुणे : राज्यात एकाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गाजत असताना शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बसमध्येच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. एसटी बसमध्ये हा प्रकार घडल्यानं विद्येच्या माहेरघरात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून त्याच्या शोधासाठी 8 पथकं रवाना करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेट बसस्थानक शहरातील सुरक्षित बसस्थानक समजलं जातं. तर 24 तास येथून बसेस जात असतात. दरम्यान, बसस्थानकात पीडित तरुणीला चुकीची माहिती देऊन डेपोत थांबलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला असल्याचे पुढे आले आहे.
स्वारगेट बसस्थानकात ही घटना पहाटे साडे पाचच्या सुमारास घडली आहे. घटनेनंतर आरोपीनं घटनास्थळावरुन पोबारा केला. हादरलेल्या तरुणीनं आरडाओरडा केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची ओळखही पटली असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची आठ पथकं रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा आरोपी रेकॉर्डवरील असला तरी स्वारगेटला इतक्या गाड्या असताना ही घटना कुणालाच कशी कळली नाही? हा प्रश्न आहे. यामुळं स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या आरोपीला शोधण्यासाठी पथकं रवाना झाली आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
"पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत धक्कादायक आहे. ही घटना चक्रावून टाकणारी आहे. 15 वर्षापूर्वीचं पुणे आणि आताचं पुणे फार बदललं आहे.
आपण सुरक्षीत घरी पोहोचू याची अगोदर हमी होती, मात्र आता पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. पुण्यातील शाळा कॉलेज, बसस्थानक परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी आम्ही वारंवार करत आहोत. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे पुण्यातील सुरक्षेसाठी पालकमंत्र्यांनी लक्ष घालावं. पुणे पोलिसांचं नेमकं काय सुरू आहे, याचा जाब पालकमंत्र्यांनी पुणे पोलिसांना विचारावा," असा हल्लाबोल उबाठा उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.
COMMENTS