पुणे | दुचाकीवरून महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघालेल्या युवकाच्या मोटारसायकलला ट्रकची पाठीमागून धडक बसली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली यु...
पुणे | दुचाकीवरून महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघालेल्या युवकाच्या मोटारसायकलला ट्रकची पाठीमागून धडक बसली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली युवती ट्रकखाली सापडल्याने जागीच मृत्युमुखी पडली तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे.
अपघातप्रकरणी मोहम्मद सलमान मोहम्मद कासीम शेख (वय २९) याच्या फिर्यादीनुसार ट्रकचालक सोनुकुमार नागेंद्रसिंग (रा. संगमनगर, वडाळा मुंबई) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रुबल राजीवकुमार सिन्हा (वय २५, रा. कोरापुट, ओडिशा, सध्या घुलेनगर मांजरी, पुणे) या युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुणे-सातारा महामार्गावर सारोळा नीरा नदीच्या पुला पलीकडे शिंदेवाडी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत हा अपघात झाला.
एका आय टी कंपनीमध्ये कामास असलेले रुबल व तिचा मित्र शहाऊद ईजाज अहमद शेख हे दोघे एका दुचाकीवर व त्यांचे मित्र मोहम्मदसलमान शेख व शाहरुखअली शेख एका दुचाकीवर अशा दोन दुचाकीवर चौघे मित्र रविवारी (ता. १२) सकाळी महाबळेश्वरला निघाले होते. सकाळी पावणेनऊच्या सुमारास सारोळा येथील नीरा नदीचा पूल पार करून शिंदेवाडी गावच्या हद्दीतून जाताना शहाऊद व रुबल याच्या मोटारसायकलला पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने ठोकर मारली. यामध्ये दुचाकी चालवणारा शहाऊद मोटारसायकलसह डाव्याबाजूस पडला तर मागे बसलेली रुबल उजव्या बाजूस ट्रकसमोर पडली. ट्रक तिच्या अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, दुसऱ्या दुचाकीवरील मोहम्मद सलमान व शाहरुख्अली यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून शहाऊद दोघांना रुग्णालयात नेले. परंतु, रुबल हिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. शिरवळ (ता. खंडाळा) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातस्थळाची वाहतूक सुरळीत केली. शिरवळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी पुढील तपास करत आहेत.
COMMENTS