सध्याच्या माहिती तंत्रज्ञान युगात सोशल मिडियाशिवाय जगणं आणि जागणं अशक्य होऊन बसलेय. ट्विटर, फेसबुक, व्हाट्सअॅप, मेसेंजर, हाईक, इंस्टाग्राम, ...
सध्याच्या माहिती तंत्रज्ञान युगात सोशल मिडियाशिवाय जगणं आणि जागणं अशक्य होऊन बसलेय. ट्विटर, फेसबुक, व्हाट्सअॅप, मेसेंजर, हाईक, इंस्टाग्राम, फ्लिकर, पिकासा एक ना अनेक समाज माध्यमांनी, आभासी मित्र-मैत्रिणींचा प्रत्येकास जणू मोहपाश म्हणा किंवा विळखा म्हणा, गुंफले किंवा जखडले आहे, असे म्हणावे लागेल.
एखादे छायाचित्र, चलचित्र, उपक्रम क्षणात जगभर प्रसारित करणे समाज माध्यमांमुळे शक्य होते. प्रत्यक्ष बोलून-सांगून होणाऱ्या संवादापेक्षाही त्याच्या अर्थाची व्याप्ती, अवकाश, व्यापकता व परिणामकारकता अधिक साधली जाते.
आज शिक्षकांपेक्षा विद्यार्थ्यांमध्ये सोशल मिडिया म्हणजेच समाज माध्यमांचा बोलबाला व वापर जास्त दिसतो. त्यांच्यातील उर्जा, सर्जनशीलता व प्रेरकता त्वरित समाज माध्यमांवर येतेच, शिवाय संदेशाचे आदान-प्रदान त्यातील अर्थग्रहण प्रतिक्रियेत सहकार्यात्मकता व भावनिकताही दिसते. जी त्यांच्या शिक्षण व्यवहारात पदोपदी मदतीस येते.
शिक्षक-प्राध्यापक म्हणून आपले, सहकाऱ्यांचे काय ? कसे चाललेय ? विद्यार्थ्यांना काय द्यायचेय ? यासाठी तर ही समाजमाध्यमे प्रभावी दूताचे काम करतात. पाठवलेल्या व्हाट्सअॅप संदेशावर निळी खूण आली की; मन समाधान पावते. असो हे जितके चांगले तितका त्याचा अतिरेक ही वाईट ! तरुण पिढी तर निम्मा वेळ यातच घालवताना जागोजागी दिसते. त्यातून एकलकोंडेपणा, चंचलता, संकुचितता, भावनाहिनता, दुरावा, उद्विग्नता, झोपेची कमतरता व शारीरिक हालचालींचे मंदावलेपण आज शैक्षणिक विकासास ग्रहण लावते हे नक्की. चांगले चांगल्यासाठी हवे तेवढेच वापरले तर, ‘आपण घडू इतरांनाही घडवू!’ हा संदेश मात्र नितांत गरजेचा आहे.
संशोधन पेपर- सोशल मिडियाचा शिक्षणावरील परिणाम
सोशल मिडिया- सोशल मिडिया अर्थात दुसऱ्यांशी जोडले जाण्याचे शारीरिक ऐवजी ऑनलाईन नेटवर्क; ज्यासाठी फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम, हाईक, मेसेंजर, फ्लिकर, पिकासा आस्क अशी समाजमाध्यमे वापरून संपर्क व संदेश देवाण-घेवाणीतून संप्रेषण साधले जाते. त्यांचा व्यावसायिक, वैद्यकीय, संशोधनपर, शैक्षणिक, राजकीय, जाहिरात विषयक बाबतीत उपयोगातून एक दुसऱ्यांबरोबर माहितीची देवाण-घेवाण व संपर्क केला जातो.
सोशल मिडियाचे प्रकार :
१) अंतर्गत समाजमाध्यम – फक्त खाजगी गटासाठी बांधील. उदा. शैक्षणिक गट, छायाचित्रकार गट ज्यासाठी परवानगी लागते.
२) बाह्य समाज माध्यम – सर्व समाजासाठी मुक्त उदा. ट्विटर, फेसबुक, व्हाट्सअॅप, मेसेंजर, हाईक, इंस्टाग्राम इत्यादींवर एक - दुसऱ्यांशी मैत्री करून जास्तीत-जास्त संख्येने एकमेकांशी लोक जोडले जातात. त्यातही अनेक गट असतात. जसे मराठा गट, हिंदी गट, शैक्षणिक गट, मानसशास्त्र गट जेथे आवड-कलानुसार व्यक्ती सहभागी होतात. आपले विषय, म्हणणे, फोटो, व्हिडीओ, आवाज शेअर करून लांब असले तरी संदेश पोहचवतात. समान विचार, संस्कृती संदर्भात जास्त काळापर्यंत संबंध ठेवले जातात.
सोशल मिडियाचा शिक्षणावरील परिणाम :
१) संप्रेषण : संदेश दळणवळणासाठी अत्यंत वेगाने, पैसा व वेळेच्या बचतीसह संदेशाचे आदान-प्रदान सहज शक्य होते. ज्यातून प्रात्यक्षिक कार्य, सूचना, फाईल, छायाचित्रे, व्हिडिओ, उपक्रम, कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण, चर्चा, कार्यशाळेतील वादविवाद, सहकार्यात्मक अध्ययन, क्रिया-प्रतिक्रिया, कँपेनिंग, शैक्षणिक माहिती, शरीरिक आरोग्य विषयक महत्वपूर्ण बाबी या आभासी जगात एकमेकांशी विना व्यत्यय पोहोचवू शकतो.
२) समस्या उकलन : एखाद्या न उलगडलेल्या समस्येसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला, मार्गदर्शन विद्यार्थी-शिक्षक संबंधितांकडे विचारणा करू शकतात. ज्यावर मार्ग सापडतो उदा. बोलीभाषेतील व नागरी भाषेतील समानअर्थाचे शब्द, इतिहासातील एखादी घटना जसे सुरतच्या दुसऱ्या लुटी संदर्भात माहिती असल्यास पाठवा, गुजरातमधील बावडी, ज्यावर अनेकांकडून प्रतिसाद व भरपूर चित्रे, व्हिडिओ, संदर्भ, माहिती मिळते.
३) सृजनशीलतेस चालना : शिक्षण, संशोधन कार्यात नवनिर्मितीचा आनंद अनोखा असतो. उदा. शैक्षणिक साहित्य, बनविलेल्या व असलेल्या शैक्षणिक अॅप्सची माहिती शेअर करणे, माहितीच्या मोहजालातील आवश्यक माहिती ज्यातून नव-नवे उपक्रम उदा. पाढे पाठांतर, स्पेलिंग पाठांतर, आकलन, कोडी, बौद्धिक प्रश्नांवरील उत्तरे, वेगवेगळ्या चाचण्या-कसोट्यांची निर्मिती व उपयोजन-प्रयोगासंदर्भातील माहिती एकमेकांना शेअरिंगने दिल्या घेतल्याने ज्ञान-विज्ञानात भरच पडते.
४) दुरस्थ शिक्षणास मदत : इच्छा असूनही शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांचा तर सोशल मिडिया व त्यातील आभासी दुनिया मित्रच बनलेली दिसते. आपल्या अभ्यासक्रमाची प्रात्यक्षिके, संदर्भ पुस्तके, माहितीचे शेअरिंग विद्यार्थी-शिक्षकांना दूर असूनही जवळ आणून एकमेकांच्या संपर्कात ठेवते. उदा. घरबसल्या केलेले कामकाज मार्गदर्शक प्राध्यापकांपर्यंत पोहोचून त्वरित शेरे, तपासणी व मार्गदर्शन प्राप्त होण्यास सोशल मिडियाचा हातभार मोठा आहे. उदा. ज्याद्वारे शिक्षक-प्रशिक्षक व M.S.W. मध्ये समाजकार्यकर्त्यात आवश्यक गुण अंगी बाणण्यास मदत होते.
५) माहितीचे आदान-प्रदान व अद्ययावतपणा : आधुनिक जीवनाचा पक्का मित्र म्हणजे सोशल मिडिया, वेबसाईट-लिंक्सद्वारे आपण आवश्यक त्या माहितीसाठी वापरकर्ता म्हणून योग्य त्यांच्याशी जोडले जातो, त्याचा शोध घेतो व आवश्यक माहिती घेऊन, बोलून आवश्यक माहिती अद्ययावत करू शकतो. जसे भारताची चांद्रयान मोहीम व सध्या आलेले नवीन शैक्षणिक धोरण, शैक्षणिक शासनादेश याबाबत आपण अद्ययावत होऊ शकतो.
६) समुपदेशन व मार्गदर्शन : सध्याच्या धावपळीच्या व स्पर्धा-संघर्षाच्या युगात थांबला तो संपला ! म्हणून मागे पडलेला, प्रवाहात येण्याची धडपड करत असलेला, समस्याग्रस्त वापरकर्ता स्वतःस व कुटुंबास समुपदेशन व शैक्षणिक मार्गदर्शन मिळवून स्वतःस, आपल्या पाल्य व कुटुंबास सावरू शकतो. शैक्षणिक उद्दिष्टे ठरवून ती गाठू शकतो. विद्यार्थी म्हणून व्यक्तीसहाय्य मिळवून शैक्षणिक समस्या-अडथळ्यांवर मात करून उद्दिष्टपूर्ती करू शकतो. शिक्षक-प्राध्यापक आपल्या विद्यार्थ्यांची गरज ओळखून नेमकी मदत मिळवून देण्यास सहाय्यभूत होऊन विद्यार्थ्यास यशस्वी होण्यास हातभार लावतो. करिअर मार्गदर्शनाद्वारे जीवनात मार्गक्रमणास दिशा दाखवतो. तसे गट, माहिती, वेबसाईट-लिंक्स देतो. ज्यातून विद्यार्थ्यांचे शिकणे, जगणे सुसह्य होते.
७) डिजिटल शिक्षणास मदत : ऑनलाईन कॉर्पोरेट ट्रेनिंग, प्रिपरेशन, वेबडिझायनिंग प्रशिक्षण इत्यादी अनेक बाबतीत डिजिटल इंडियास सोशल मीडियाची मदत होत आहे. ‘टॅलंटेज’चे आदित्य मलिक, मुख्य कार्यकारी अधिकारी-व्यवस्थापकीय संचालक यांच्या मते, “समाजमाध्यमे ही शैक्षणिक साधने असून जी देशातील डिजिटल अध्ययन, शैक्षणिक प्रक्रिया व भावी करिअरसाठी नागरी व ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना व गरजूंना चांगले सहाय्य देत आहे. त्यास मोबाईल हे साध्यप्राप्तीचे महत्वपूर्ण साधन बनले आहे.” तसेच “Live interactive digital learning empowers the learners to receive for excellence, quality education any time and anywhere.” असेही ते पुढे म्हणतात. शासनही त्यासाठी प्रयत्नरत आहे.
८) घातक परिणाम : सोशल मिडियाचा अतिवापर विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक सर्वांसाठीच घातकही ठरत आहे. उदा. डोळे, मेंदू, शारीरिक हालचालींचा मंदपणा, एकाग्रताभंग, हॅकिंग, धोकेबाजी, व्हायरस, माहितीची चोरी, ओळखीची चोरी, अद्यानाचा गैरफायदा, एखाद्या प्रतिक्रियेवर, टिप्पणीवर वाद होऊन संघर्षही होतो.
९) खाजगीपणावर संक्रांत : विद्यार्थी, शिक्षक, संबंधित तज्ज्ञ, मार्गदर्शक यांचे फोटो, व्हिडीओ, वैयक्तिक माहिती अनावश्यक व्यक्तींपर्यंत पोहचून व एकमेकांतील इर्षा, भावना शून्यतेतून वैयक्तिक खाजगी आयुष्य ढवळून निघते, शैक्षणिक नुकसानही होते.
१०) वेळेचा अपव्यय : बऱ्याचदा गुडमॉर्निंग, गुडनाईट व वैयक्तिक अनावश्यक माहिती, फोटो, व्हिडीओ चाळण्यात अल्पवयीन, तरुण, विद्यार्थी अनेक ठिकाणी गर्क झालेले दिसतात. त्यावरून वेळेची नासाडी, उर्जा व उमेदीची प्रचंड हानी होते.
अभ्यासास आवश्यक एकाग्रता जाऊन चिडचिड, एकलकोंडेपणा, खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष, मेंदू-डोळ्यांस अतीताणातून निद्रानाश अशा मानसिक समस्या उद्भवून प्रचंड शैक्षणिक नुकसानीकडे सध्या विद्यार्थी जाताना दिसतो. मोबाईलचा अतिरेक ज्यावर पालकांचा नाईलाज झालेला दिसतो, मोबाईल काढून घेतला तर विद्यार्थी आत्महत्येचाही मार्ग अवलंबतात. म्हणून शिक्षक-प्राध्यापकांची समुपदेशनाची मात्रा सोशलमिडियाचा अतिवापर टाळून शैक्षणिक सहकार्यातून, मैदानी खेळांची जोड देवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक-सर्वांगीण प्रगतीसाठी विद्यार्थ्यांस हातभार लावतील, अशी अपेक्षा आहे.
लेखक प्रा. अनिल नारायण निघोट
सहा. प्राध्यापक, डॉ. एम.ए. खान कॉलेज ऑफ एज्युकेशन, मंचर
9422463300
COMMENTS