धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या कॉलेज परिसरातील अनेक कॅफेवर पोलिसांनी अचानक छापा टाकला. यावेळी अश्लिल चाळे करणाऱ्या युवक-युवतींना पोलिसां...
धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या कॉलेज परिसरातील अनेक कॅफेवर पोलिसांनी अचानक छापा टाकला. यावेळी अश्लिल चाळे करणाऱ्या युवक-युवतींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
कॉलेज परिसरात अशाप्रकारे विद्यार्थी-विद्यार्थींना खुलेआम अश्लील चाळे करण्यासाठी पडदे लावणाऱ्या कॅफे चालकांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून गेल्या काही दिवसांपासून होत होती. आमदार अनुप अग्रवाल, मनपा आयुक्त तसेच पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये हा छापा टाकण्यात आला आणि एकच खळबळ उडाली. देवपुरातील कॉलेज परिसरात दिवसाढवळ्या भर वस्तीत चालविण्यात येत असलेल्या अनधिकृत कॅफेत पडदे लावून तयार केलेल्या छोट्या छोट्या कंपार्टमेंटमध्ये कॉलेजची मुले-मुली अश्लील चाळे करत आहेत, अशी माहिती देवपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे आज अचानक धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, मनपाच्या आयुक्त अमिता दगडे पाटील, तसेच पोलिस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सर्व अनधिकृत कॅफेंवर छापा टाकत अनेक तरुण-तरुणींना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी कॅफे हाऊससंदर्भातील अटी आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे. धुळे पोलिसांनी कॅफे हाऊसमधील कॉलेज कपल्सला समजावून सांगितले आणि त्यानंतर त्या सर्वांना त्यांच्या घरी पाठवले. या छापेमारीनंतर पोलिसांनी कॉलेज कपल्सना समाजाची प्रतिष्ठा कायम राखण्यासंदर्भात समजावत आवाहन केले आहे. तसेच, यापुढेही अशा प्रकारच्या कृतींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
COMMENTS