बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सीआयडीच्या तपासाला वेग आला आहे. या प्रकरणानंतर चर्चेत आलेला वाल्मिक कराड पुण्यात स...
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सीआयडीच्या तपासाला वेग आला आहे. या प्रकरणानंतर चर्चेत आलेला वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीसमोर शरण आला.
देशमुख यांच्या हत्येनंतर जवळपास 22 दिवसांनी कराड शरण आला आहे. वाल्मिक कराड याच्यावर पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. कराड सीआयडीला शरण आल्यानंतर देशमुख यांची मुलगी वैभवी हिची प्रतिक्रिया समोर आली. ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी तिने केली आहे.
आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे हीच मागणी आहे. पोलीस यंत्रणा काम करतेय मग इतका वेळ का लागतोय? गुन्हेगार स्वत: सरेंडर होत असेल, मग पोलीस यंत्रणा काय काम करतेय? असे प्रश्न कराड यांच्या अटकेनंतर वैभवीने उपस्थित केले आहेत.
या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी तिने केली आहे. वैभवी म्हणाली की, ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली, त्यांच्यावर कारवाई करा. वडिलांना पुन्हा आणू शकत नाही. माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये जे कोणी असतील, त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी तिने केली.
दरम्यान, आज वाल्मिक कराड स्वतः पुण्यात सीआयडीला शरण गेला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आले आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे मागील काही दिवसांपासून या प्रकरणावरून राज्यकीय आरोप-प्रत्योराप पाहायला मिळत आहे.
सीआयडीसमोर आत्मसमर्पण करण्यापूर्वी वाल्मिक कराड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
वाल्मिक कराड व्हिडिओत नेमकं काय म्हणाला ?
सीआयडीला शरण जाण्यापूर्वी कराडने एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये त्याने केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाल्याचा आरोप केला आहे. "मी वाल्मिक कराड, केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना, सीआयडी ऑफिस, पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे."
पुढे त्याने म्हंटले की, "संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी, राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि मी त्यात दोषी दिसलो, तर न्यायदेवता जी शिक्षा देईल, ती भोगायला मी तयार आहे,' असे वाल्मिक कराडने व्हिडीओत म्हटले आहे.
COMMENTS