बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर मोठी खळबळ उडाली असतानाच आता धाराशिव जिल्ह्यातही असाच एक प्रकार घडला आहे....
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर मोठी खळबळ उडाली असतानाच आता धाराशिव जिल्ह्यातही असाच एक प्रकार घडला आहे. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील सरपंच नामदेव निकम यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
तुळजापूरमधील बारुळ गावानजीक हा प्रकार घडला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
नामदेव निकम हे मेसाई जवळगा गावचे सरपंच आहेत. नामदेव निकम हे बारुळ गावातून आपल्या मेसाई जवळगा गावाच्या दिशेने गुरुवारी (ता. २६) रात्री जात असताना काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. गुंडांनी नामदेव निकम यांच्या गाडीवर अंडी फेकत त्यांची गाडी अडवली. त्यानंतर त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. यानंतर गुंडांनी निकम यांच्या गाडीवर पेट्रोल ओतून गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने सरपंच नामदेव निकम यांचा जीव थोडक्यात बचावला आहे. त्यांच्यासोबत असलेली एक व्यक्ती जखमी झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येत पंचनामा केला. प्राथमिक तपासात हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाला असल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सरपंच नामदेव निकमांनी सांगितले की, ‘मी रात्री तुळजापुरवरुन जवळग्याला परतत होतो. त्यावेळी माझ्या गाडीच्या दोन्ही बाजुंनी अचानक दोन दुचाकी आल्या. ते सतत हॉर्न वाजवत होते. त्यांना पुढे जायचे आहे असे आम्हाला वाटले गाडी हळू केली. आमच्या गाडीचा वेग जसा कमी झाला तसा एका बाजूने गाडीवर दणका बसला. डाव्या बाजूच्या दरवाजाची काच फोडून आमच्या गाडीत पेट्रोलचे फुगे टाकण्यात आले. तेव्हा आम्ही गाडीचा वेग वाढवला आणि पुढे गेलो. त्यानंतर आमच्या गाडीच्या काचेवर अंडी फेकण्यात आली. अंडी फेकल्यामुळे समोरचं काही दिसेनासे झाले. त्यामुळे आमची गाडी पुन्हा हळू झाली. त्यानंतर गुंडांनी गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून झाला असावा, असा माझा संशय आहे.’
COMMENTS