प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्राच्या माध्यमातून "शेतीमाती-अन्नाच्या कृतज्ञतेची पेरणी"या ...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्राच्या माध्यमातून "शेतीमाती-अन्नाच्या कृतज्ञतेची पेरणी"या विषयावर नुकतीच एक दिवसीय कार्यशाळा समर्थ गुरुकुल,बेल्हे या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये संपन्न झाली.
पहिली ते दहावीपर्यंतच्या ३१५ मुलांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला.शेतीमाती कार्यशाळेच्या माध्यमातून मुलांनी आपल्या अन्नाशी प्रत्यक्ष ओळख आणि खेळांच्या माध्यमातून अन्नातील पोषणमूल्य आणि त्यांचे महत्त्व याविषयी हसत खेळत माहिती मिळवली.या निमित्ताने पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्राच्या माध्यमातून मातीचं संग्रहालय व शेती संस्कृतीच्या विविध वस्तू यांचीही मांडणी मुलांसाठी करण्यात आली होती.या मांडणीचा आस्वाद मुलांसोबत शिक्षकांनीही घेतला.आपलं अन्न नेमकं कसं बनतं?आपल्यासाठी त्याचं काय महत्त्व आहे? या गोष्टी मुलांना हसत खेळत आणि गमतीच्या माध्यमातून अनुभवता आल्या.आपण जे खातो त्या अन्नाच्या निर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी असणारे सर्व घटक आणि त्यांच्या प्रति असणारी कृतज्ञतेची जाणीव ही भावना,पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्राचे संचालक मनोज व नम्रता हाडवळे यांनी मुलांना खेळ,गप्पा व गोष्टींच्या माध्यमातून सहजपणे समजावून सांगितली.मनोज हाडवळे यांनी शेतीमाती उपक्रमाची संकल्पना समजावून सांगताना आपलं अन्न,आपलं त्याच्याशी असलेलं नातं त्याच्या निर्मिती प्रक्रिया असणारी आपली जवळीकता आणि त्याचा आपल्या तनामनावर होणारा परिणाम याविषयी सहजपणे पण अतिशय महत्त्वाची गोष्ट मुलांना सांगितली.शेती म्हणजेच आपल्या अन्न निर्मितीची प्रक्रिया ही आपल्यासाठी एक थेरपी कला आणि ध्यान आहे.मुलांना ते जे खातात त्या प्रती सजग करण्यासाठी तसेच आपल्या आई-वडिलांच्या मेहनतीची जाणीव रुजण्यासाठी आणि अन्न निर्मिती प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या सर्व घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतीमाती हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.सध्या पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्रामध्ये सुरू असलेला हा उपक्रम आता शाळांमध्ये घेऊन जाण्याचा आपला मानस मनोज हाडवळे यांनी बोलून दाखवला.शेतकरी कुटुंबात लहानाचं मोठं होत असताना, शेतीचे उच्च शिक्षण घेऊन,२०११ पासून शेती पर्यटनात काम करत; शेती या बहुआयामी संकल्पनेला जगण्याच्या अजून जवळ आणण्यासाठी काम करायचं आहे असा निर्धार मनोज हाडवळे यांनी या निमित्ताने व्यक्त केला.
शेतीमाती हा एक अभिनव उपक्रम असून विद्यार्थ्यांना अन्नधान्य,पोषणतत्व याविषयी आवड निर्माण होऊन त्यांच्या ज्ञानात अधिकची भर या निमित्ताने पडेल असे प्रतिपादन प्राचार्य सतिश कुऱ्हे यांनी केले.
मनोज हाडवळे व नम्रता हाडवळे यांच्या माध्यमातून शेतीमाती उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर समर्थ गुरुकुल मध्ये कार्यशाळेच्या स्वरूपामध्ये घेतलेला आहे. यानंतर महाराष्ट्रातील अनेक विविध शाळांमध्ये अशा प्रकारचा उपक्रम आयोजित करण्याचा मानस असल्याचे मनोज हाडवळे यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,सारिका ताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्राचार्य सतीश कुऱ्हे,क्रीडा संचालक एच पी नरसुडे,पर्यवेक्षक सखाराम मातेले,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,गुरुकुल मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS