सत्ता असो की नसो अजित पवार आणि पिंपरी-चिंचवड असं समीकरण गेली कित्येक वर्ष राज्याच्या राजकारणात आहे. मात्र आता अजित पवार यांचे शिलेदार त्या...
सत्ता असो की नसो अजित पवार आणि पिंपरी-चिंचवड असं समीकरण गेली कित्येक वर्ष राज्याच्या राजकारणात आहे. मात्र आता अजित पवार यांचे शिलेदार त्यांची साथ सोडत असल्याचं दिसून येत आहे.
अजित गव्हाणे यांनी २५ नगरसेवकांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करून अजित पवारांना पहिला धक्का दिला होता.
गव्हाणे यांच्यानंतर अजित पवार गटाचे आणखी एक सहकारी विलास लांडे यांनाही शरद पवारांनी टिपल्याची चर्चा आहे. दसऱ्याच्या आसपास विलास लांडे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. विलास लांडे यांचा मुलगा विक्रांत लांडे यांनीच तसं सूचक वक्तव्य केलं आहे.
भोसरीपाठोपाठ चिंचवडमधूनसुद्धा अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. भाऊसाहेब भोईर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यावर ठाम आहेत. गेली पंधरा वर्ष माझ्यावर अन्याय झाल्याचा त्यांनी दावा केलाय. दोन ऑक्टोबरच्या निर्धार मेळाव्यातून भोईर भूमिका स्पष्ट करणार आहेत. पिंपरी-चिंचवडप्रमाणेच दौंडमध्येही माजी आमदार रमेश थोरात सुद्धा आता लवकरच तुतारी हाती घेणार असल्याचं त्यांनीच स्पष्ट केलंय.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार रॅलीद्वारे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. मात्र त्यांच्याच बालेकिल्ल्यातले अनेक मोहरे त्यांना सोडून शरद पवारांच्या पक्षात जाताना दिसून येतं आहे. त्यामुळे अजितदादांचे मोहरे काकांनी म्हणजे शरद पवारांनी टिपल्याची चर्चा आहे.
सुप्रिया सुळे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
मुंबईत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून गांधी जयंती निमित्तानं पदयात्रा काढली. सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील हे पदयात्रेत सहभागी झाले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असतांना फडणवीस फोडाफोडीचं राजकारण करत असल्याची टीका सुळेंनी केलीय. तर जितेंद्र आव्हाड पदयात्रेत होते का असा सवाल करत फडणवीस यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका केलीय.
COMMENTS