मावळ मतदारसंघात विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे विद्यामान आमदार सुनिल शेळके यांनी एकीकडे दुसऱ...
मावळ मतदारसंघात विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे विद्यामान आमदार सुनिल शेळके यांनी एकीकडे दुसऱ्या टर्मची तयारी केलेली दिसते.
तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात महायुतीतील अनेक मातब्बर नेते मंडळी उभी ठाकली आहे. यादरम्यान शुक्रवारी (दि. २०) आमदार सुनिल शेळके यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यात आमदार शेळकेंनी अनेक गोष्टींचा खुलासा आणि काही गौप्यस्फोट केले आहे. यावेळी त्यांनी २०१९ च्या निवडणूकीत आपल्याला तिकीट कसे मिळाले, याबद्दलचा घटनाक्रमही सांगितला आहे. ( जुन्नर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा फक्त क्राईमनामा Live वर )
भाजपाचे निष्ठावंत शेळके कुटुंब –
सुनिल शेळके हे स्वतः आणि त्यांचे कुटुंब भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंतांपैकी एक होते. त्यांच्या चार पिढ्या या भाजपातूनच राजकारणात पुढे आल्याचे स्वतः सुनिल शेळके यांनी सांगितले. तसेच २०१९ च्या निवडणूकीसाठी आपण अनेक वर्षे तयारी करत होतो, त्यातून तिकीटासाठी प्रयत्न सुरू होते, परंतु अखेरच्या क्षणी काही घडामोडी घडल्या. त्यामुळे भाजपाची साथ सुटली मात्र, आजही भाजपाच्या वरीष्ठांबद्दल आदर आहे, तसेच भाजपाचे कार्यकर्तेही सोबत असल्याचे आमदार सुनिल शेळके यांनी सांगितले.
एका रात्रीतून परिस्थिती बदलली –
२०१९ साली जाहीर झालेल्या तिकीटाचा घटनाक्रम आमदार सुनिल शेळके यांनी स्वतः उलगडून सांगितले. ते म्हणाले, ‘ २ ऑक्टोबरच्या सायंकाळी स्व. दिगंबर दादा यांच्या सोबत भाजपाच्या शिष्टमंडळाला पुण्यात भेटायला गेलो होतो. तिथे त्यांना शिष्टमंडळाने सांगितले की यावेळी भाजपाची उमेदवारी बदला आणि आम्हाला संधी द्या. पण तिथेच बाळाभाऊंची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर रात्री ११ वाजता आपण, दिगंबर दादा, रवी भेगडे तळेगावात परत आलो. त्यानंतर पुढे काय करायचा याचा विचार सुरु होता. परंतु दुसऱ्या दिवशी ३ ऑक्टोबर रोजी सकाळीच अजित पवार यांनी माझ्या पक्षप्रवेशापूर्वीच राष्ट्रवादीकडून माझी उमेदवारी जाहीर केली.’
मी असं एकदा संधी द्या म्हटलो होतो, पण…
‘आमदार सुनिल शेळके भाजपातून राष्ट्रवादीत आले आणि एकदा आमदार होण्याची संधी मागितली म्हणून त्यांना उमेदवारी दिली, पण ते आता दुसऱ्यांदा आमदारकीसाठी तिकीट मागतायेत’ असा आरोप होत असल्याचा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी आमदार सुनिल शेळके यांना प्रकट मुलाखतीदरम्यान विचारला. त्यावर बोलताना आमदार सुनिल शेळके यांनी हे सर्व आरोप फेटाळले. तसेच, आपण एकदा संधी द्या असे पक्षाकडे कधीही बोललो नव्हतो आणि चारभिंतीआडही बोललो नव्हतो, असे ठामपणे सांगितले. ‘मी एकदा संधी द्या असं बोललो होतो, पण ते मावळच्या चाळीत ते पंचेचाळीस हजार जनतेपुढे बोललो होतो. मावळच्या मायबाप जनतेच्या सेवेसाठी आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एकवेळ संधी द्या असं मावळच्या जनतेला बोललो होतो, कुठेही चारभिंतीआड किंवा पक्षाकडे तसं बोललो नव्हतो, असे आमदार सुनिल शेळके यांनी ठोकपणे सांगत सर्व चर्चांवर पुर्णविराम दिला.
COMMENTS