लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सगळेच राजकीय पक्ष तयारी करत असतानाच शरद प...
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सगळेच राजकीय पक्ष तयारी करत असतानाच शरद पवारांच्या गळाला आणखी एक पुतण्या लागला आहे.
या पुतण्याने त्याच्या आमदार काकांविरोधातच दंड थोपटले असून राष्ट्रवादीची तुतारी हातात घेण्याची तयारी केली आहे. माढा विधानसभेमध्ये विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांच्याविरोधात पुतण्या धनराज शिंदे यांनी दंड थोपटले आहेत.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनीही शरद पवारांकडे तुतारीची मागणी केली होती. आता अजून एका पुतण्याने बंड करत माढा विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात आपल्या चुलत भावाच्या किंवा चुलत्याच्या विरोधात उभं राहण्याचे संकेत दिले आहेत.
धनराज शिंदे यांनी मानेगाव येथे जाहीर सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला आहे. येणाऱ्या काळात रणजीत सिंह शिंदेंविरोधात धनराज शिंदे अशी लढत होण्याची शक्यता माढा विधानसभेत आहे. शरद पवारांकडे आपण उमेदवारीची मागणी केली असून ते मला उमेदवारी देतील, असा विश्वास धनराज शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसंच काहीही झालं तरी बबनदादांना साथ देणार नसून त्यांच्या विरोधात काम करणार असल्याची भूमिका धनराज शिंदे यांनी घेतली आहे. धनराज शिंदे यांनी माढा तालुक्यातील मानेगाव येथे मेळावा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
COMMENTS