विधानसभेची निवडणूक पुढ्यात आलेली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षा...
विधानसभेची निवडणूक पुढ्यात आलेली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचे नेते तयारीला लागले आहेत.
अनेक नेते विविध मतदारसंघाचा दौरा करत कामांचा, पक्ष संघटनेचा आढावा घेत उमेदवारांची चाचपणी देखील करत आहेत. या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध महायुती अशी मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये धुसफूस सुरु असल्याची चर्चा आहे. त्यातच अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार का? याबाबत अनेकदा राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, आता शरद पवार यांनी यासंदर्भात बोलताना चार शब्दांत प्रतिक्रिया देत सूचक भाष्य केलं आहे.
खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) २०२३ मध्ये फूट पडली. या फुटीनंतर पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असे दोन गट पडले. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सत्तेत आहे, तर शरद पवार गट विरोधी पक्षात आहे. त्यामुळे अनेकदा दोन्ही गट आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातही दोन्ही गट आमने-सामने आले होते. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाची देशभरात चर्चा झाली होती. आता विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे राज्यात घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महायुतीचे नेते राज्यभरात सभा मेळावे घेत आहेत, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या देखील बैठका आणि सभांचा धडाका सुरु आहे.
याच अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाची कोकणात सभा पार पडली. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना राज्यातील विविध प्रश्नासंदर्भात भाष्य केलं. यावेळी शरद पवार यांनी महायुतीच्या (Mahayuti) सरकारवरही हल्लाबोल केला. याचवेळी शरद पवार यांना अजित पवार यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. भविष्यात काका-पुतण्या एकत्र येतील का? कारण राज्यातील अनेकांना वाटतं की काका-पुतण्या एकत्र येतील, असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, “आम्ही घरात सर्व एकत्रच आहोत.” दरम्यान, शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासंदर्भातील प्रश्नावर अगदी मोजक्या शब्दांत मात्र, सूचक उत्तर दिलं. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
COMMENTS