वास्तविक लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महाराष्ट्राच्या राजकारण बदलायला सुरुवात झाली. मागील पाच वर्षात झालेल्या पक्षफुटींचा फटका भाजप आ...
वास्तविक लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महाराष्ट्राच्या राजकारण बदलायला सुरुवात झाली. मागील पाच वर्षात झालेल्या पक्षफुटींचा फटका भाजप आणि महायुतीला बसणार किंवा नाही, याबाबत संभ्रम होता.
मात्र त्यामुळेच अनेक नेते काठावर होते. महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर हा संभ्रम दूर झाला आणि काठावरील नेत्यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे रिघ लागली.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे येणाऱ्या अर्जांची संख्या लक्षणीय आहे. काँग्रेसकडे राज्यभरातून अडीच हजार अर्ज आले आहेत. यात विदर्भ आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू असलेल्या मराठवाड्यातील इच्छुकांची संख्या मोठी आहे.
शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकासारखाच 'स्ट्राइक रेट' विधानसभा निवडणुकीतही कायम राखण्याचा चंग बांधला आहे. एकट्या पुणे शहरातील आठ मतदारसंघांसाठी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाकडे ४१ इच्छुकांचे अर्ज आले आहेत. यानिमित्ताने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अच्छे दिन आले आहेत.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) १३, राष्ट्रवादी काँग्रेसला ८ आणि शिवसेनेला ९, अशा महाविकास आघाडीला एकूण ३० जागा मिळाल्या. सांगली मतदारसंघात काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. ते विजयी झाले आणि त्यांनी काँग्रेससोबत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे काँग्रेसच्या जागांची संख्या १४ आणि महाविकास आघाडीच्या विजयी खासदारांची संख्या ३१ झाली.
राज्यात 'मिशन ४५' ची काही वर्षांपासून तयारी करणाऱ्या महायुतीला केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले. यापूर्वीच्या निवडणुकीत २३ जागा जिंकणाऱ्या भाजपला केवळ ९ जागा मिळाल्या. शिवसेना शिंदे गटाला ७ तर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली.
महाविकास आघाडीची ताकद किती मोठ्या प्रमाणात वाढली आहे, यासाठी निवडणुकीपूर्वीचे राज्यातील राजकीय वातावरण आणि निवडणूक प्रचारादरम्यानचे चित्रही पाहावे लागेल. निवडणुकीच्या आधी महायुतीतील तिन्ही पक्षांनी हवा तयार केली होती. उद्धव ठाकरे यांचे ४० आमदार त्यांना सोडून गेले होते.
शरद पवार यांच्या पक्षालाही फुटीची लागण झाली आणि त्यांचेही ४० आमदार त्यांना सोडून गेले. काँग्रेसचे तर कशातच काही नाही अशी अवस्था होती. दोनदा मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याने काँग्रेसचा हात सोडून भाजपचा आश्रय घेतला होता. याशिवायही काँग्रेसच्या अन्य काही बड्या नेत्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता.
महाविकास आघाडीला लोकसभेच्या ४८ मतदारसंघांत उमेदवार मिळतील किंवा नाही, अशी शंका होती. महायुतीच्या नेत्यांकडून तसा प्रचारही सुरू करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात तब्बल १८ जाहीर सभा घेतल्या होत्या. त्यांच्या जोडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही प्रचाराचे मैदान गाजवत होते.
भाजपच्या १०५ आमदारांच्या जोडीला शिंदे आणि अजितदादांचे प्रत्येकी ४० आमदार होते. महाविकास आघाडीकडे होते ते फक्त शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या तरुण नेत्यांची फळी. या सर्वांचे बळ आणि मतदारांनी दाखवलेला विश्वास, याच्या बळावर महाविकास आघाडीने मैदान मारले. शरद पवार यांनी १० उमेदवार उभे केले आणि ८ विजयी झाले. काँग्रेसने १७ जागा लढवून १३ जिंकल्या.
COMMENTS