महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवा...
महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारी झाल्यानंतर राज्यस्तरावर त्यांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरू आहेत.
महायुतीतील मोठे पक्ष छोट्या-मोठ्या पक्षांना किती जागा देणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तरच महायुती सोबत जाण्याचा निर्णय घेण्याची भूमिका अपक्षांसह छोट्या पक्षांची आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून सन्मानजनक जागा न मिळाल्यास राज्यात १५ ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे.
येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीतील जागा वाटपाबाबत चर्चा होणार आहे. त्यामुळे जागा वाटपाबाबत जोगेंद्र कवाडे यांनी थेट इशारा दिला आहे.
पीपल्स पार्टी ही महायुतीतील एक घटक पक्ष आहे. मात्र जागा वाटपा संदर्भात पीपल्स रिपब्लिकन पार्टीला विश्वासात न घेतल्याने राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, कोल्हापूर दक्षिण आणि इतर जिल्ह्यातील बिलोली अमरावती, अकोला मतदारसंघात जागेसाठी आमचा आग्रह आहे. असेही जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले आहे.
महादेव जानकर स्वबळावर?
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी देखील महायुतीला इशारा दिला आहे. जर सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर सर्वच जागा लढण्याची तयारी राष्ट्रीय समाज पक्ष करेल. दरम्यान, महायुतीमधील प्रमुख भाजप, शिंदे गट, अजित पवार गटाचे जागा वाटप झाल्यानंतर ते पक्ष आपल्या कोटातून छोट्या पक्षांना जागा सोडणार असल्याची चर्चा आहे.
COMMENTS