खरं तर काही राजकारण्यांना विधानसभेचे वेध लागले असताना काही विधान परिषदेवर आपली वर्णी लागण्याच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील विधान परिषदेच्...
खरं तर काही राजकारण्यांना विधानसभेचे वेध लागले असताना काही विधान परिषदेवर आपली वर्णी लागण्याच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांचा वाद गेली जवळपास चार वर्षे चिघळत असून येत्या विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सत्ताधारी महायुती या १२ जागा भरणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
सहा-तीन-तीन वर एकमत
राज्यपालांच्या कोट्यातील डझनभर पदे जून २०२० पासून रिक्त आहेत. सत्ताधारी महायुतीतील पक्ष भाजपा, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीपूर्वी या १२ जागा भरण्यावर एकमत झाले असून भाजपाच्या वाट्याला ६ आणि शिववसेना-राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी ३ जागा मिळतील.
भाजपाकडून १५ इच्छूक
भाजपाकडून सहा नावांची शिफारस करण्यात येणार आहेत. या सहा जागांसाठी जवळपास १५ उमेदवार इच्छूक असल्याचे समजते. यात माजी आमदार सुधाकर कोहळे, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, महिला आघाडीच्या अध्यक्ष चित्रा वाघ, अध्यात्मिक आघाडीचे अतुल भोसले, प्रदेश भाजपाचे माजी प्रवक्ते माधव भांडारी, नाशिकचे बाळासाहेब सानप आणि हर्षवर्धन पाटील यांची नावे चर्चेत आहेत. यातील हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असून ते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.
पक्षांतर्गत विरोध
तर शिवसेना (शिंदे) पक्षाकडून ज्योति वाघमारे, राहुल कणाल, मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तिय आणि मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांची नावे चर्चेत आहेत. कणाल यांच्या नावालाही पक्षांतर्गत विरोध होत असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून रुपाली चाकणकर, सिद्धार्थ कांबळे, आनंद परांजपे, धनगर समाजाचे विश्वास देवकाते तसेच अल्पसंख्यांक समाजाचे प्रतिनिधि बाबा सिद्दीकी किंवा सना मलिक शेख यांना संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. चाकणकर यांना पक्षातीलच रुपाली ठोंबरे यांनी उघड विरोध केला आहे तर ठोंबरे यांनाही पक्षातूनच विरोध होताना दिसत आहे. (Mahayuti)
चार वर्षे प्रलंबित
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकारने ६ नोव्हेंबर २०२० रोजी विधान परिषदेसाठीच्या १२ नावांची शिफारस तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली होती, मात्र त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. पुढे जून २०२२ मध्ये ठाकरे-सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ( Eknath Shinde) झाले. फेब्रुवारी 2023 मध्ये कोश्यारी यांच्या जागी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली. तर जुलै २०२३ मध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सामील झाले. (Mahayuti)
COMMENTS