येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. त्यादृष्टीने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पुढील महिन...
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. त्यादृष्टीने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजतील आणि प्रत्यक्षात नोव्हेंबरमध्ये मतदान होईल, अशी चिन्हे आहेत.
त्यातही नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्या आठवड्यात राज्यातील विधानसभा निवडणुका २ टप्प्यातील होतील, असे संकेत दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये दिले. त्यानुसार राज्यात १५-२० नोव्हेंबरदरम्यान विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ऑक्टोबरच्या दुसर्या आठवड्यामध्ये निवडणुकीची घोषणा करताच महाराष्ट्रात आचारसंहिता लागू शकते, असे राजकीय तज्ज्ञांचे अंदाज आहेत.
सध्याच्या १४ व्या महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ हा २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंतच आहे. तत्पूर्वी राज्यात विधानसभा निवडणुका घेऊन नवीन सरकार स्थापन करणे आवश्यक आहे. सध्या जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या दोन्ही राज्यातील निवडणूक निकाल ८ ऑक्टोबर २०२४ रोजी एकत्रितच जाहीर होतील. महाराष्ट्रात १५ ते २० नोव्हेंबरदरम्यान दोन टप्प्यात निवडणूक घ्यायची झाल्यास किमान ३०-४५ दिवसांचा आचारसंहितेचा कालावधी गृहीत धरून केंद्रीय निवडणूक आयोग ९ ते १५ ऑक्टोबरदरम्यान निवडणुकीच्या तारखांची घोषणा करेल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. विशेष म्हणजे २०१९ साली २१ ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान झाले होते.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पानिपतानंतर महायुतीकडून विधानसभा निवडणुकीसाठी नव्याने व्यूहरचना करण्यात येत असली तरी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची शिवसेना आणि भाजपा असा अंतर्गत संघर्ष पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे, मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे. ज्या पक्षाला सर्वाधिक जागा त्याला मुख्यमंत्रीपद असे सूत्र महायुती आणि महाविकास आघाडीचे असले तरी, या पदाची लालसा प्रत्येक पक्षाला आहे.
COMMENTS