लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने चांगलीच कंबर कसली आहे. पण जागावाटपाच्या मु्द्द्यावरून तिन्ह...
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने चांगलीच कंबर कसली आहे. पण जागावाटपाच्या मु्द्द्यावरून तिन्ही पक्षात वादाचे फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे.
अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्यासाठी तगडी प्लानिंग सुरु असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. जागावाटपाचा मुद्दा पुढे करून त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे अजित पवार मोठा निर्णय घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
विधानसभेपूर्वी महायुतीत वादाचे फटाके
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत सध्या जागावाटपावरून बैठका सुरु आहेत. कोण किती जागांवर लढणार याबाबत वरिष्ठांमध्ये चर्चेची खलबंत रंगत आहेत. यावरून तिन्ही पक्षात सातत्याने वाद होत असल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाने महायुतीमधून बाहेर पडून स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवावी, असा प्लान भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने आखला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
अजित पवारांना सर्वात कमी जागा मिळणार?
अजित पवार जर महायुतीत राहिल्यास भाजप आणि शिवसेनेच्या (Shivsena) वाट्याला कमी जागा येतील. पण ते जर बाहेर पडल्यास अधिकाअधिक जागा लढवता येतील. त्यामुळे दोन्ही पक्षाने अजित पवारांवर बाहेर पडण्यास दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. जर अजित पवार महायुतीत राहिल्यास त्यांना कमीत कमी जागा घेऊन निवडणूक लढवावी लागेल.
अजितदादा महायुतीतून बाहेर पडणार?
अजित पवारांना जर ही तडजोड स्वीकारायची नसेल तर वेगळे होऊन लढण्याशिवाय त्यांना पर्याय उरणार नाही असे सूत्रांचे म्हणणे आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविरोधात भाजपचे इच्छुक तयारी करत असल्यानं अजित पवारांची कोंडी होत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे जागावाटपातील अपेक्षाभंगाचं कारण देत अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जातेय.
शिंदे-भाजप किती जागा लढवणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. मात्र, भाजप १६०-१७० जागा लढवण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने देखील १०० जागांची मागणी केली आहे. यापैकी किमान ९० जागा पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. अजित पवार यांनी जरी ८० ते ९० जागांची मागणी केली असली, तरी त्यांच्या वाट्याला जेमतेम २०-२५ जागाच येण्याची शक्यता आहे.
COMMENTS