बच्चू कडू हे नाव माहीत नाही, अशी एकही व्यक्ती महाराष्ट्रात नसेल. सत्तेत असूनही सतत वेगवेगळे आंदोलन, आक्रमकपणा, कधी अधिकार्यांना मारहाण यामु...
बच्चू कडू हे नाव माहीत नाही, अशी एकही व्यक्ती महाराष्ट्रात नसेल. सत्तेत असूनही सतत वेगवेगळे आंदोलन, आक्रमकपणा, कधी अधिकार्यांना मारहाण यामुळे आमदार बच्चू कडू कायम चर्चेत असतात.
कुठलेही मोठे पाठबळ किंवा मोठ्या पक्षाचा पाठिंबा नसतानाही बच्चू कडू अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून सतत दोन दशकांपासून निवडून येत आहेत.
येत्या विधानसभा निवडणुकीतही बच्चू कडू रिंगणात उतरतील, हे निश्चित आहे. मात्र, त्यांच्याविरोधात स्थानिक राजकारणात मोठे आव्हान तयार झाले आहे. त्यामुळे बच्चू कडू यांचा विजय यावेळी इतका सोपा असणार नाही, त्यांचा पराभवही होऊ शकतो असेही काही राजकीय जाणकार सांगतात.
बच्चू कडू यांचा राजकीय प्रवास
बच्चू कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख असून, त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्यामुळे त्यांना विदर्भात एक वेगळे स्थान आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांचे कार्यकर्ते आहेत. स्वतःच्या मतदार संघातही त्यांची पकड मजबूत आहे. उमेदीच्या काळात पहिल्यांदा पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले होते. नंतर त्यांनी स्वतःची प्रहार ही संघटना स्थापन केली.
आता प्रहार राजकीय पक्ष आहे. याच पक्षाकडून कडू हे चार वेळा अचलपूर मतदार संघातून निवडणूक आले. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत बच्चू कडूंना सत्ता विरोधी लाटेला सामोरे जावे लागू शकते. विरोधकांनी ही लाट 'कॅश' करण्यासाठी आपली व्यूहरचना तयार केली आहे.
लोकसभा निवडणुकीतील परिणाम आणि स्थानिक राजकारण
बच्चू कडू महायुतीत सहभागी आहेत. परंतु, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार दिला होता. लोकसभा निवडणुकीत प्रहारचे दिनेश बूब यांना ८५ हजार ३०० मते मिळाली. मात्र, अचलपूर मतदारसंघात काँग्रेसचे बळवंत वानखडे यांनी ६ हजार ७९३ मतांनी आघाडी घेतली. या पराभवामुळे विरोधकांनी बच्चू कडूंवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसने या मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
हे आहेत संभाव्य उमेदवार
महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे बबलू देशमुख हे संभाव्य उमेदवार म्हणून समोर येत आहेत. देशमुख हे अमरावती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. सध्या कॉंग्रेससचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी या मतदारसंघात गाठीभेटी वाढविल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदार संघात कॉंग्रेसला विजय मिळाल्याने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे.
त्याचबरोबर भाजपकडून सुधीर रासे, नंदू वासनकर, प्रवीण तायडे यांची उमेदवारीची चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडी, रिपाइं, मनसे यांच्याकडूनही उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बच्चू कडूंना सर्वपक्षीय विरोधाचा सामना करावा लागू शकतो.
COMMENTS