अहमदनगरच्या राजकारणात थोरात विरूद्ध विखे हा संघर्ष सर्वांनाच माहित आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष पुन्हा उफाळून येण्य...
अहमदनगरच्या राजकारणात थोरात विरूद्ध विखे हा संघर्ष सर्वांनाच माहित आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर हा विधानसभा मतदार संघ आहे.
या मतदार संघातून ते तब्बल ७ वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. यावेळी त्यांच्या समोर थेट विखे पाटील यांचे आव्हान असणार आहे. तसे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे थोरातांच्या गडात विखे विरूद्ध थोरात असा सामना रंगणार आहे.
लोकसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांचा मोठा पराभव झाला. त्यानंतर ते आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यांनी थेट काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना आव्हान देण्याचे ठरवले आहेत. ते आगामी विधानसभा निवडणूक संगमनेर विधानसभा मतदार संघातून लढण्याची दाट शक्यता आहे. तसे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. सात वेळा थोरातांना संधी दिली, मला एकदा देवून पाहा, संगमनेर मतदार संघाचा कायापालट करुन दाखवला नाही तर सुजय विखे नाव सांगणार नाही अशी साद संगमनेरकरांना सुजय विखे यांनी घातली आहे.
लोणी सारखे दशक्रीया विधी घाट पाहीजे असेल तर विखे पाटीलच करु शकतात. विकासाची ताकद विखे पाटलील यांच्यामध्येच आहे असेही सुजय विखे यांनी सांगितले. नगर दक्षिण मधून पराभव पदरी पडल्यानंतर सुजय विखे संगमनेरमध्ये अधिक सक्रीय झाले आहेत. त्यांचे अलिकडेच संगमनेर मतदार संघात दौरे वाढले आहे. सुजय विखे गाठी भेठी घेत कार्यक्रमांना उपस्थित राहताय. याआधी ही त्यांनी संगमनेरमधून विधानसभा लढवण्याचे संकते दिले होते. त्यातच आता अधिक सक्रिय होत संगमनेरमध्ये तळ ठोकल्याचं दिसून येतेय.
संगमनेर हा बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला समजला जातो. ते या मतदार संघातून सलग सात वेळा निवडून आले आहेत. अशा वेळी त्यांचा हा बालेकिल्ला भेदण्याचे मोठे आव्हान विखे पाटील यांच्या समोर असणार आहे. एकदाही पराभव न पाहिलेल्या थोरातांना पराभूत करणे सोपे नसणार आहे. याची कल्पना विखे पाटील यांना आहे. त्याची कबूलीही त्यांच्या कार्यकर्त्याने दिली आहे. मात्र नगरमध्ये विखेंच्या वर्चस्वाला लोकसभा निवडणुकीत सुरूंग लागला आहे. अशा वेळी विखेंसाठी ही अस्तित्वाची लढाई असणार आहे.
आता पर्यंत थोरात यांना कोणी आव्हान देणारा तगडा उमेदवार नव्हता. मात्र यावेळी भाजप सुजय विखे यांनाच थेट मैदानात उतरवणार असल्याने इथली लढत चुरशीची होण्याची दाट शक्यात आहे. शिवाय सुजय विखेंसाठी पुन्हा एक संधीही असणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांचा राष्ट्रवादीच्या निलेश लंके यांनी पराभव केला होता. हा पराभव विखे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आपली ताकद आणि दबदबा कायम राखण्यासाठी विखे पाटलांची ही धडपड सुरू असल्याचेही बोलले जात आहे.
COMMENTS