कांद्याच्या प्रश्नावरून प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. तुम्ही आम्हाला ...
कांद्याच्या प्रश्नावरून प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. तुम्ही आम्हाला योजना काय देताय? त्यापेक्षा आमच्या कांद्याला भाव द्या, आम्ही प्रत्येक आमदाराला वर्षाला ४ क्विंटल कांदा, मुख्यमंत्र्यांना १५ क्विंटल तर पंतप्रधानांना ट्रकभर कांदा मोफत देऊ, असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू हे नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी उमराणा येथील जाहीर सभेत बोलताना बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
बच्चू कडू म्हणाले, जेव्हा शेतमालाचे भाव पडतात तेव्हा एकही खासदार, आमदार बोलत नाही. तेव्हा तुम्हाला तुमचा पक्ष प्रिय असतो. आता आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखविणार आहे, तुम्ही आम्हाला रडवलं आता आम्ही तुम्हाला रडवणार आहोत. काँग्रेस आणि भाजपने निर्माण केलेली लुटणारी व्यवस्था आम्ही उखडून फेकणार आहोत. तुम्ही काय आम्हाला योजना देतात, आमच्या कांद्याला भाव द्या, आम्ही मुख्यमंत्र्यांना १५ क्विंटल तर पंतप्रधानांना ट्रकभर कांदा मोफत देऊ, असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारवर सडकून टीका केली.
यावेळी बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या २ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यामध्ये चांदवड -देवळा मतदार संघातून गणेश निंबाळकर तर निफाडमधून गुरुदेव कांदे यांची प्रहारकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आपण जीवाचे रान करून आपल्या विचाराचे आमदार निवडून आणावे, असं आवाहन बच्चू कडू यांनी उपस्थित जनतेला केलं.
दरम्यान, नाफेड, एनसीसीएफच्या कांदा खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांच्याकडे केली असता बच्चू कडू यांनी सरकारवर संताप व्यक्त केला. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी कांदा खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करत लक्ष घालण्याची मागणी करत लक्ष द्या, अन्यथा तुमच्या गाडीवर कांदा फेकत थोबाड लाल करण्याचे आंदोलन करू, असा इशारा बच्चू कडू यांनी यावेळी दिला.
COMMENTS