प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) आज बुधवार दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी संत तुकाराम विद्यालय निरगुडे, ता. जुन्नर येथील किशोरवयीन मुलींसाठी...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
आज बुधवार दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी संत तुकाराम विद्यालय निरगुडे, ता. जुन्नर येथील किशोरवयीन मुलींसाठी डिसेंट फाउंडेशन पुणे या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून किशोरवयीन मुली वैयक्तिक स्वच्छता व जनजागृती अभियानांतर्गत *"कळी उमलताना"* हा कार्यक्रम घेण्यात आला.
मुलींनी मासिक पाळी बाबत काही शंका किंवा प्रश्न असल्यास आपल्या आईशी, शिक्षिकेशी किंवा डॉक्टरांशी मनमोकळेपणाने बोलले पाहिजे. या वयात शरीरात होणाऱ्या बदलांविषयी जाणून घेतले पाहिजे. तसेच जर काही त्रास होत असेल तर त्याविषयी निसंकोच पणे बोलले पाहिजे. मासिक पाळी हे एक नैसर्गिक घटना चक्र आहे त्याला अपवित्र मानू नये. असे आवाहन यावेळी डॉ.शुभांगी वलवणकर यांनी मुलींना मार्गदर्शन करताना केले.
यावेळी मासिक पाळीच्या काळात स्वच्छता कशी राखावी, पर्यावरण पूरक सॅनिटरी पॅड चा वापर कसा करावा व त्याची विल्हेवाट कशी लावावी, या काळात आहार कसा असावा, व्यायाम कसा करावा याबाबतही त्यांनी मुलींना मार्गदर्शन केले.
तसेच डॉ. फकीर आतार यांनी मुलींना मानसिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करत असताना, मोबाईलचा योग्य वापर करा. आई-वडील आपले दैवत आहेत, त्यांच्याशी संवाद ठेवा आणि चांगली संगत करा असे आवाहन मुलींना केले.
डिसेंट फाउंडेशनने संपूर्ण पुणे जिल्ह्यातील पंचवीस हजार किशोरवयीन मुलींपर्यंत हा उपक्रम पोहोचवला असून, त्यांना मोफत पर्यावरण पूरक सॅनिटरी पॅड व "कळी उमलताना" या मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप केले आहे.
याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, सचिव डॉ. फकीर आतार, प्रमुख मार्गदर्शिका डॉ.शुभांगी वलवणकर , संचालक आदिनाथ चव्हाण, सोनाली रोकडे,विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय कालेकर, जितेंद्र चौधरी, विष्णू खेडकर , नवनाथ आनंदराव, श्रीमती दुर्गादेवी राऊत, गौरव कळंबे, समन्वयक योगेश वाघचौरे,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थिनींना मोफत कळी उमलताना या मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब खंडांगळे यांनी केले तर आभार श्रीरंग कळमकर यांनी मानले.
COMMENTS