प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) जुन्नर, प्रतिनिधी : संतश्रेष्ठ माउली श्रीज्ञानेश्वर महाराजांनी प्रारंभ केलेल्या भागवत परंपरेच्या दृष...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
जुन्नर, प्रतिनिधी : संतश्रेष्ठ माउली श्रीज्ञानेश्वर महाराजांनी प्रारंभ केलेल्या भागवत परंपरेच्या दृष्टीने आत्यंतिक महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी शिवनेरीवरुन गेलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पादुकांचे स्वस्थानी शिवनेरीवर आगमन झाले. श्रीशिवजन्मभूमी स्थानी पादुकांच्या साक्षीने शिववंदना अभिवादन झाल्यानंतर, मुख्य पुजारी सोपान दुराफे यांनी श्री शिवाई देवीच्या चरणांशी श्रींच्या पादुकांना स्थापित केले. याप्रसंगी उपस्थित बालगोपालांच्या हस्ते शिवाई देवी व शिवाजी महाराजांच्या आरतीने या वर्षीच्या सोहळ्याची सांगता झाली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकाच्या ३५० व्या वर्धापन वर्षात, ज्येष्ठ शुद्ध एकादशीस शिवनेरीहून निघालेल्या शिवरायांच्या या पादुका राजाभिषेक उत्सवासाठी राजधानी रायगडास गेल्या होत्या. तेथून आपल्या निर्धारित मार्गाने पायीच प्रवास करत आषाढी एकादशीस शिवबा-विठोबा भेटीचा सोहळा पार पडल्यानंतर हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत हौतात्म्य पावलेल्या आपल्या सहकाऱ्यांना दर्शन भेट द्यायला गेल्या होत्या. पावनखिंड, नेसरी, कापशी, कुरुंदवाड, वडगाव, तळबीड, उमरठ मध्ये आपल्या पराक्रमी मावळ्यांशी हितगुज केल्यानंतर जुन्नरखालील बारा मावळांचा प्रवास करुन शिवजन्मभूमीत परतल्या. श्रीशिवछत्रपती पालखी सोहळ्याचे समन्वयक डॉ. संदीपराज महिंद गुरुजी याप्रसंगी बोलताना म्हणाले, कोरोनाचे बिकट संकट असतानाही आपल्या नियमित प्रथा-परंपरा जपताना २०२० व २०२१ लाही शिवरायांचा पालखी सोहळा रायगडाहून पायीच पंढरपूरला विठुरायाच्या भेटीस गेला होता. आषाढी वारीत आपली पायी चालण्याची परंपरा प्रतिकूलतेतही अखंडितपणे जपलेला हा सोहळा आता कात टाकून नव्या जोमाने, मोठ्या उत्साहात पंढरीची वारी करुन परतला आहे.
आषाढी वारीच्या निमित्ताने भक्तिसागरात सामील होण्यासाठी निघालेल्या या शक्तिपरंपरेतील शिवरायांच्या पादुका दरवर्षी शिवनेरी, संग्रामदुर्ग, लाल महाल, मल्हारगड, पुरंदर, रायरेश्वर असा प्रवास करून रायगडला जातात. तेथून 'नाम घेता वाट चाली l यज्ञ पाऊला पाऊली l' या भावाने पायी वाटचाल करत पंढरपूरची आषाढी वारी पूर्ण केल्यानंतर पुढील साडे दहा महिन्यांच्या कायम वास्तव्यासाठी या पादुका शिवजन्मभूमीत परत येत असतात. *शिवछत्रपतींच्या पादुकांच्या पालखी सोहळ्याचे हे यंदाचे १० वे वर्ष तर परंपरेचे ३० वे वर्ष आहे.
शिवनेरीवरील शिवाई देवीच्या चरणांशी श्रीशिवछत्रपतींच्या पादुका पुन:स्थापित करण्याची सेवेची संधी यावर्षी बारा मावळातील पौड खोऱ्याला प्राप्त झाली होती. रितेश जाधव, देवाशीष बंदोपाध्याय, रोहन जाधव, विशाल किरवे, राज पायगुडे, अक्षय इप्ते यांच्या नेतृत्वात आलेल्या पौड मधील महिला व बालगोपालांच्या गटाने यावर्षीच्या वारीचा समारोप करताना विशेष मेहनत घेतली.
श्रींच्या पालखी सोहळा समापनास यशस्वी करण्यासाठी स्थानिक पातळीवर गौरीशंकर सामाजिक प्रतिष्ठानचे संदीप ताजणे, अक्षय कुटे यांनी सक्रीय सहभाग घेत परिश्रम घेतले. तर आवश्यक त्या परवानग्या मिळण्यासाठी पुरातत्व विभागाचे अधिकारी बाबासाहेब जंगले, उमर शेख , मंगेश रोकडे तसेच श्री शिवाई देवी मंदिराचे पुजारी पुजारी सोपानजी दुराफे, जुन्नरचे उपवनसंरक्षक नारायण राठोड, अमोल सातपुते आदि सर्व शासकीय व स्थानिक श्री शिवाई देवी मंदिर संस्थान, कुसूरचे सर्व विश्वस्त आणि कुसूर ग्रामस्थ आदींचे सहकार्य लाभले.
चौकटीत:
कर्फ्यूतही परंपरा कायम राखून शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचलेच
विशाळगडावर झालेले अतिक्रमण काढून टाकण्याच्या निमित्ताने झालेल्या आंदोलनाचे पर्यावसन जातीय हिंसाचार व दंगलीत झाल्यानंतर यावर्षी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश काढून पांढरपाण्यापासूनच पावनखिंड -विशाळगडापर्यंत कर्फ्यु लावला होता. यामुळे शिवाजी महाराजांच्या पावनखिंड मोहीम मार्गास अडथळा निर्माण झाला असता *शिवरायांच्या पालखी सोहळ्यातील शिवभक्त आपल्या विगत ३० वर्षांच्या प्रथा-परंपरा जपण्यासाठी पराकोटीचे आग्रही होते. श्रीशिवछत्रपतींच्या पालखी सोहळ्याच्या नियमित व्यवस्थांचा सन्मान राखत अखेरीस प्रशासनास आषाढी वारीनंतर परतीचा प्रवास करणाऱ्या शिवबांच्या पादुकांची व विशाळगडावरील बाजी-फुलाजींच्या समाधीसह अज्ञात तीनशे बांदल वीरांच्या समाधीची भेट घडवावीच लागली.
COMMENTS