प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजने ( सर ) जुन्नर : सातवाहन काळातील महिलांचे जीवन सुखकर करणाऱ्या रोमन पद्धतीच्या जांत्याच्या वरील तळीचे अवशेष जु...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजने ( सर )
जुन्नर : सातवाहन काळातील महिलांचे जीवन सुखकर करणाऱ्या रोमन पद्धतीच्या जांत्याच्या वरील तळीचे अवशेष जुन्नर जवळील अगरगांवत आढळले . शहरा जवळील अगरगांवाचा प्राचीन इतिहास पुरातत्त्वविद्या पुस्तकाद्वारे समजावून घेण्यासाठी भटकंती करीत असताना आडव्या दांड्याच्या जांत्याचे अवशेष दिसल्याचे इतिहास अभ्यासक बापूजी ताम्हाणे यांनी सांगितले.
जुन्नर मध्ये इसवी सनाच्या सुरुवातीच्या एक दोन शतकात वैशिष्ट्यपूर्ण आडव्या दांड्याची जांती प्रचलित झाली . त्या अगोदर जुन्नर परिसरात धान्य दळण्यासाठी जांती नव्हती या काळात महिला रात्रभर धान्य भिजत ठेवून सकाळी दगडी पाटा - वरवंट्याच्या साह्याने वाटून त्याची जाडी भरडी भाकरी ( रोट ) बनवून खात असत. पाटा - वरवंट्याच्या सुधारणेतून जांत्याची निर्मिती झाली. जुन्नर परिसराचा रोमन साम्राज्याशी नाणेघाट मार्गे व्यापार सुरू झाल्यानंतर दगडाचे गोल फिरणारे आडव्या दांड्याचे जांते जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील लोकवस्तीच्या स्थळी आले. या जांत्यामुळे सातवाहन काळातील महिलांचे धान्य दळण्याचे काम सुकर झाले.
जांते हा शब्द यंत्रकम् या यंत्रवाचक शब्दापासून बनलेला आहे. यंत्रकम् - यंतम्- जतम् - जत व पुढे जांते हा शब्द मराठीत आला . हंड्यासारखा आकार असलेल्या या जांत्याचा खालील भाग पातळ, पण वरचा भाग खूप उंच वजनदार अशा दगडाचा असतो . जांत्याचे हे दोन्ही भाग जांत्याची तळी म्हणून ओळखले जातात. जांत्याची खालची तळी स्थिर असते या तळीच्या मध्यवर्ती भागात लोखंडी किंव्हा लाकडी खोट्याभोवती वरची तळी फिरण्याची व्यवस्था केलेली असते. वरच्या तळीला जांते फिरविण्यासाठी लाकडी आडवा दांडा बसवण्यासाठी समोरासमोर दोन भोके पाडलेली असतात. वरील तळीच्या गोलाकार मध्यभागातून धान्य टाकण्याची सोय केलेली आहे .
दोन महिला समोरा- समोर बसून आडवा दांडा हातात धरून वरची तळी गोलाकार फिरवत असताना मध्यभागी असणाऱ्या पेल्याच्या आकाराच्या छिद्रातून धान्य टाकले जाई. दोन तळ्याच्या घोषणामुळे धान्याचे पीठ होऊन ते तळ्यांच्या कडेला असणाऱ्या फटीतून बाहेर पडत असत. सातवाहन काळातील मानवी समाजाच्या पाकक्रियेत झालेल्या सुधारणाचा भाग म्हणून आडव्या दांड्याच्या जांत्याची निर्मिती झाली असावी अशा प्रकारची आडव्या दांड्याची लहान, मोठी जांती गोळेगाव, नेवासा, पैठण, तेर इत्यादी सातवाहन काळातील गांवामधून तसेच लोथल इटलीतील पाँम्पे येथील उत्खननात सापडलेली आहेत.
प्रचलित दंगडी जांत्यापेक्षा हे जांते वेगळे असल्याने प्राचीन जुन्नर आणि प्राचीन रोम यांच्या दोन हजार वर्षे जुन्या व्यापारी संबंधाचा पुराव असल्याचे बापूजी ताम्हाणे, यांनी सांगितले.
COMMENTS