प्रतिनिधी : नवनाथ मोरे जुन्नर : जुन्नर तालुका परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. अशाच शिरोली खुर्द (ता.जुन्नर) या ठिकाणी बिबट्याने दीड ...
प्रतिनिधी : नवनाथ मोरे
जुन्नर : जुन्नर तालुका परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. अशाच शिरोली खुर्द (ता.जुन्नर) या ठिकाणी बिबट्याने दीड वर्षाच्या चिमुरडीवर हल्ला करून ठार केल्याची घटना गुरुवारी (दि. ११) पहाटे ५ वाजताच्या दरम्यान घडली. या हल्ल्यामध्ये चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. संस्कृती संजय कोळेकर (वय, दीड वर्ष) असे या हल्ल्यात ठार झालेल्या मुलीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, मेंढपाळ संजय कोळेकर यांनी शिरोली खुर्द येथील शेतकरी संपत केरू मोरे यांच्या शेतामध्ये मेंढरांचा वाडा लावला होता. त्यावेळी आज गुरुवारी पहाटे ५ दरम्यान मेंढपाळ झोपेत असताना बिबट्याने हल्ला करून या चिमुरड्या मुलीला शेतात ओढून नेले.
मेंढपाळाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा करून स्थानिक नागरिकांना याबाबत कळवले. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी, स्थानिक नागरिक व रेस्क्यू टीमने शोध घेतला असता ८ वाजण्याच्या दरम्यान या चिमुरडीच्या मृतदेहाचे काही अवशेष सुभाष थोरात व विश्वास जाधव यांच्या उसाच्या शेताच्या बांधावर आढळून आले. या धक्कादायक घटनेने परिसरामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके व विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर व पोलीस कर्मचारी तसेच वनविभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
COMMENTS