प्रतिनिधी : किरण म्हसकर जुन्नर,ता.११ : पश्चिम आदिवासी भागातील घाटघर व अंजनावळे येथील अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पासाठी स...
जुन्नर,ता.११ : पश्चिम आदिवासी भागातील घाटघर व अंजनावळे येथील अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पासाठी सर्वेक्षणाच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. प्रकल्पासाठी आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत तर काही शेतकरी भूमीहीन होणार असून विस्थापित होण्याची भीती असल्याने स्थानिक ग्रामस्थांचा या प्रकल्पास असणारा विरोध कायम आहे.
या प्रकल्पामुळे सह्याद्रीच्या रांगांमधील निसर्गातील जैवविविधतेला धोका निर्माण होणार असल्याची भीती पर्यावरण प्रेमीकडून व्यक्त होत आहे. नाणेघाट परिसरात गेल्या काही वर्षात वाढीस लागलेल्या पर्यटनास खीळ बसण्याची शक्यता व्यावसायिक व्यक्त करत आहेत. मागील वर्षी सर्वेक्षणास आलेल्या कर्मचाऱ्यांना विरोध झाल्याने सर्वेक्षण झाले नाही त्यामुळे आता गेल्या तीन दिवसांपूर्वी ड्रोन फिरत असल्याचे दिसल्याने सर्व्हे साठी या भागात ड्रोनचा वापर होत असल्याचे माजी सरपंच पोपट रावते यांनी सांगितले.
आदिवासी भागातील अनुसूचित क्षेत्रात येणाऱ्या गावात पेसा कायदा लागू आहे. पेसा कायद्यानुसार या क्षेत्रात कोणताही प्रकल्प सुरू करायचा झाल्यास त्या प्रकल्पाला ग्रामसभेची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. या प्रकल्पासाठी मात्र कोणत्याही प्रकारची ग्रामसभांची मान्यता घेण्यात आलेली नसल्याने आदिवासींच्या हक्कासाठी असणाऱ्या पेसा कायद्याची शासनाकडूनच पायमल्ली केली जात असल्याचे सरपंच मनोज नांगरे यांनी सांगितले.
राज्य सरकारचा ऊर्जा विभाग व अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी यांच्यामध्ये २८ जून २२ मध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार उर्जा साठवण प्रणाली तसेच इतर अक्षय ऊर्जा स्त्रोत प्रकल्पाच्या घाटघर व अंजनावळे ता.जुन्नर गावातील सर्व्हे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी मार्फत करण्यात येणार आहे. त्यांना सहकार्य करावे असे पत्र तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी मागील वर्षी दोनही ग्रामपंचायतीला दिले होते.
अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून घाटघर व अंजनावळे (लव्हाळी) ग्रामपंचायतीच्या हद्दीत माळशेजघाट भोरांडे पंप स्टोरेज प्रकल्प (PSP) च्या विकासासाठी टोपोग्राफी आणि जिओ फिजिकल इन्व्हेस्टिगेशनची कामे करण्यासाठी सर्व्हे करण्यात येणार असल्याचे समजते. ह्या प्रकल्पासाठी आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार असल्याने या प्रकल्पास स्थानिक पातळीवर विरोध होत असल्याचे चित्र आहे.
COMMENTS