दादर मुंबई १० मार्च २०२४ सुनिर्मल फाउंडेशन संस्था मुंबई तर्फे ८ मार्च जागतिक महिलादिन निमित्ताने मुंबई मराठी ग्रंथालय नायगाव दादर मुंबई येथे...
दादर मुंबई १० मार्च २०२४
सुनिर्मल फाउंडेशन संस्था मुंबई तर्फे ८ मार्च जागतिक महिलादिन निमित्ताने मुंबई मराठी ग्रंथालय नायगाव दादर मुंबई येथे महाराष्ट्र हिरकणी पुरस्कार - २०२४ सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी महिलांच्या सन्मानासाठी पुरुषांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरुवातीला दिवंगत अभिनेत्री राजश्री काळे यांना शब्दश्री विलास देवळेकर यांनी शब्द श्रद्धांजली अर्पण केली . याप्रसंगी मुंबईचे माजी महापौर मा. महादेव देवळे, माजी महापौर सौ. स्नेहल आंबेकर, ज्येष्ठ पत्रकार श्रीमती राही भिडे, दै. आपले नवे शहरचे उपसंपादक मा. राजेंद्र घरत ,कार्यक्रमाचे आयोजक साप्ताहिक भगवे वादळचे संपादक मा.दत्ता खंदारे , शब्दश्री विलास देवळेकर,जेष्ठ कवी शशिकांत सावंत, परिक्षक म्हणून राजकवी डॉ.ख . र . माळवे, वर्ल्ड व्हिजन टाईम्सचे संपादक आणि साहित्यिक प्रा. नागेश हुलवळे, जेष्ठ कवी मा. राजेश साबळे त्याचबरोबर संस्थेचे मान्यवर पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील यशस्वी पुरस्कारार्थी महिला आणि मान्यवर कवी उपस्थित होते.
ओतूर गावचे सुपुत्र ज्येष्ठ साहित्यिक राजेश साबळे ओतुरकर, राजकवी डॉ.ख.र.माळवे आणि वर्ल्ड व्हिजन टाईम्स मुंबई आणि वर्ल्ड व्हिजन संस्थेचे संस्थापक आणि साहित्यिक प्रा. नागेश हुलवळे हे तीन साहित्यिक एकाच वेळी परीक्षक म्हणून उपस्थित होते. हा दुर्मिळ योगायोग आज मुंबईतील दादर येथील मराठी ग्रंथ संग्रहालयातील सभागृहात घडून आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील , ओतुर परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे आणि वेगवेगळ्या क्षेत्राचा अनुभव असणारे आणि त्याच बरोबर साहित्य क्षेत्रातही खूप नावाजलेले ही तीन साहित्यिक एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.
महाराष्ट्रात हा योग प्रथमच घडून आला असावा. या सोहळ्यात अनेक नामांकित आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा महाराष्ट्राची हिरकणी पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला .यासोबत तिन्ही परीक्षकांना मान्यवरांच्या शुभहस्ते कवी नारायण सुर्वे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
डॉ.ख.र.माळवे रेल्वे विभागात स्टेशन मास्टर म्हणून कार्यरत होते . त्यानंतर सेवानिवृत्त झाले असून त्यांनी विपुल लेखन केलेले आहे . त्यांनी सुमारे पाच हजार कवितांचे लेखन केले आहे . त्यांच्या चाळणीवाला या काव्यसंग्रहाला राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे .
मा. राजेश साबळे ओतूरकर हे बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागात कलाशिक्षक व कला शिक्षक केंद्रप्रमुख पदावर सेवा करून सेवानिवृत्त झाले असून साहित्य क्षेत्रातही त्यांचा फार मोठा नावलौकिक आहे. त्यांची आत्तापर्यंत १४ पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या "खंत" या कवितेला दहा हजाराचा पुरस्कार( ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) पिंपरी चिंचवड पुणे येथे आणि "तिरंगा कसा दिसावा" या कवितेला पाच हजार रुपयांचा पुरस्कार ९६ व्या अ भा मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे प्राप्त झाला आहे .
साहित्यिक , संपादक प्रा. नागेश हुलवळे हे फक्त रात्रशाळेत कार्यरत आहेत . त्यांचा आनंदाच्या लहरी हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे . त्यांचा Earth Constitution ह्या इंग्रजी पुस्तकाचा पृथ्वी संघराज्याचे संविधान हा मराठी अनुवाद प्रकाशित झाला आहे . त्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय विश्वस्नेही पुरस्कार - २०२२ ने सन्मानित करण्यात आले आहे . त्यांचे साहित्य क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे. त्यांची इतर पुस्तके प्रकाशित झाली आहेत . वर्ल्ड व्हिजन टाईम्स मुंबई या साहित्यिक अनियतकलिकचे ते संपादक आहेत .
शिवजन्म भुमीतील तीनही साहित्यिकांना संपादक मा. दत्ता खंदारे यांनी जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या एकाच व्यासपीठावर आणून त्यांचा यथोचित सन्मान केला आहे. हा मोठा दुर्मिळ योगायोगाच होता . संपादक दत्ता खंदारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार!!!
COMMENTS