नाशिक : नाशिकमध्ये ३५ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धांना गेल्या रविवारपासून (ता. ४) प्रारंभ झाला असला तरी, या स्पर्धेचे औपचारिक...
नाशिक : नाशिकमध्ये ३५ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धांना गेल्या रविवारपासून (ता. ४) प्रारंभ झाला असला तरी, या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन आज (गुरुवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व राज्याचे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीमध्ये चार वाजता होणार आहे.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धांचे नियोजन करण्यात आलेले आहे.
३५ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीतील १९ मैदानावर सुरू आहेत. या स्पर्धेचे यजमानपद नाशिक शहर पोलिस आयुक्तालय भूषवित आहे. या स्पर्धांचा समारोप येत्या शनिवारी (ता. १०) सायंकाळी साडेचार वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते विजेते संघ व खेळाडूंना पदक प्रदान केले जाणार आहे.
या स्पर्धांसाठी राज्यभरातून साडेतीन हजार पोलिस खेळाडू सहभागी झालेले आहेत. त्याचप्रमाणे, राज्यातील अपर पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक आदी वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित राहणार आहे. राज्य पोलिस क्रीडा स्पर्धांसाठी नाशिकमध्ये आलेल्या राज्यभरातील पोलिस खेळाडू व अधिकार्यांसाठी शहर पोलिस आयुक्तालयातर्फे सर्वोत्तम सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
पुरुष खेळाडूंसाठी पंचवटीतील म्हाडाची इमारतीत तर महिला खेळाडूंची महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये निवासाची सोय केली आहे. भोजनाचीही उत्तम सोय उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. खेळाडूंसाठी देण्यात आलेल्य सोयीसुविधांची पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वत: पाहणी करून खेळाडूंना कोणतीही अडचण येणार याची काळजी घेत आहेत.
COMMENTS