ज्येष्ठ लेखक, विचारवंत व महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष हरी नरके यांचं आज सकाळी मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्यान...
ज्येष्ठ लेखक, विचारवंत व महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष हरी नरके यांचं आज सकाळी मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं पुरोगामी चळवळीची व समता परिषदेची मोठी हानी झाली आहे.
मागच्या काही दिवसांपासून हरी नरके आजारी होते. त्यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं १५-२० दिवस उपचार घेतल्यानंतर महिन्याभरापूर्वी त्यांना राजकोट इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांची प्रकृती स्थिर झाली होती. राजकोटहून मुंबईला येत असताना आज सकाळी सहा वाजता गाडीत त्यांना दोन वेळा उलट्या झाल्या. त्यानंतर त्यांना एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
हरी नारके यांचा जन्म हा १ जून, १९६३ रोजी झाला. नरके हे एक मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर होते. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक देखील होते. ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते. सोशल मीडियावर ते प्रचंड सक्रिय होते. फेसबुकच्या माध्यमातून ते आपले विचार बेधडकपणे मांडत.
महात्मा फुले हा जिव्हाळ्याचा विषय
महात्मा फुले हा त्यांच्या अभ्यासाचा आणि जिव्हाळ्याचा विषय होता. महात्मा फुले यांची बदनामी: एक सत्यशोधन आणि महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा ही त्यांची पुस्तकं प्रचंड गाजली. याशिवाय विविध सामाजिक विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण लिखाण केलं होतं. क्रांतीबा महात्मा फुले यांच्यावर विपुल लेखन त्यांनी केलं.
ओबीसींच्या प्रश्नाचे अभ्यासक
ओबीसींच्या प्रश्नांवर त्यांचा मोठा अभ्यास होता. समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसीच्या मुद्द्यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना अनेकदा धारेवर धरलं होतं. पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतही त्यांनी उल्लेखनीय काम केलं होतं. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिलं होतं.
COMMENTS