छत्रपती संभाजीनगर: एकाच कुटूंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शहरातील सातारा पोलिस स्टेशन परिसरातील वळदगाव येथे ...
छत्रपती संभाजीनगर: एकाच कुटूंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शहरातील सातारा पोलिस स्टेशन परिसरातील वळदगाव येथे उघडकीस आली आहे. मोहन प्रतापसिंग डांगर (वय 30), पूजा मोहन डांगर (वय 25) आणि श्रेया डांगर (वय 5) अशी मृतांची नावे आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील वळदगाव येथे राहणारे मोहन डांगर यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलीचा आज (शुक्रवार) सकाळी मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे याची माहिती सातारा पोलिसांना देण्यात आली होती. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून, मृतदेह घाटीत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
मोहन डांगर हे वळदगाव येथे भाड्याच्या घरात राहत होते. तसेच शेती करुन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. डांगर कुटुंब गुरुवारी रात्री जेवण करुन झोपले होते. पूजा याचे सासर माहेर एकाच गावात असल्याने त्यांची मुलगी श्रेया ही दररोज सकाळी शेजारीच राहणाऱ्या आजीकडे जात असते. मात्र, आज सकाळी श्रेया घरी आली नसल्याने आजी तिला पाहण्यासाठी मोहन यांच्या घरी आल्या होत्या. दरम्यान घरात पाहताच त्यांना नातीसह तिघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यामुळे त्यांना धक्काच बसला आणि त्यांनी आरडाओरडा करत शेजाऱ्यांना आवाज दिला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार मोहन डांगर यांनी पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीची हत्या करुन स्वतः गळफास घेतला असल्याचे संशय आहे. मात्र, शवविच्छेदनाचा अहवाल हाती आल्यानंतर कारण समजू शकेल. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
COMMENTS