क्राईमनामा लाईव : मुं बई-बडोदा एक्स्प्रेस वेच्या भूसंपादनासाठी पालघर पोलिसांनी आज भयंकर अमानुषपणा केला. आधी मोबदला द्या मग भूसंपादन करा, अश...
क्राईमनामा लाईव : मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वेच्या भूसंपादनासाठी पालघर पोलिसांनी आज भयंकर अमानुषपणा केला. आधी मोबदला द्या मग भूसंपादन करा, अशी मागणी करणार्या डहाणू तालुक्यातील धानिवरी इभाडपाडा येथील आदिवासी कुटुंबातील महिलांना पोलिसांनी अक्षरश: विवस्त्र करत खेचून घराबाहेर काढले.
म्हातारे-कोतारे, पोरंबाळं यांची पर्वा न करता सर्वांना राहत्या घरातून हुसकावून लावले आणि त्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवले. सरकारच्या या जुलूमशाहीविरोधात पालघर जिल्ह्यात प्रचंड संताप पसरला आहे.
मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वेसाठी भूसंपादन करताना पालघर जिल्ह्यातील अनेक गावात प्रशासन आणि बाधित रहिवाशांमध्ये प्रचंड वाद होत आहे. डहाणूमधील धानिवरी इभाडपाडा गावात आठ आदिवासी कुटुंबे पिढ्यान्पिढ्या राहतात. तेथे त्यांचीच वहिवाट आहे. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. इतर उत्पन्नासाठी त्यांनी झाडेही लावली आहेत. आदिवासींची ही घरे मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वेमध्ये बाधित होणार आहेत. या जागेच्या मूळ मालकाने भूसंपादनाचा मोबदला घेतला आहे. परंतु आम्ही पिढ्यान्पिढ्याचे रहिवासी आहोत. कब्जेदार वहिवाटदार आहोत, आम्हालाही मोबदला द्या म्हणजे आम्ही दुसरीकडे जागा घेऊन घरे बांधू, अशी मागणी येथील आदिवासी गावकर्यांची आहे.
महिला, वृद्धांवर पोलीस अमानुषपणे तुटून पडले
आज या जागेचे भूसंपादन करण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी पोलिसांच्या फौजफाट्यात आले. घरातून बाहेर पडण्यास आदिवासी महिला आणि वृद्धांनी नकार देताच पोलीस त्यांच्यावर अमानुषपणे तुटून पडले. घर सोडण्यास नकार देणार्या महिलांना महिला पोलिसांनी अक्षरश: खेचत घराबाहेर काढले. यावेळी या महिलांची वस्त्रे खेचली गेली. त्यामुळे त्या अर्धनग्न विवस्त्र झाल्या. परंतु त्याची पर्वा न करता पोलीस त्यांना खेचतच होते. अहो त्या महिलांचे कपडे बघा… त्यांची अवस्था बघा.. असे गावकरी ओरडत होते. तरीही पोलीस जबरी बळाचा वापर करतच होते.
पोलिसांनी संसार रस्त्यावर फेकला.. प्रचंड आक्रोश
या आदिवासी कुटुंबांचा संसार पोलिसांनी घराबाहेर फेकून रहिवाशांना रणरणत्या उन्हात रस्त्यावर आणले. या रहिवाशांच्या डोळ्यादेखत त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवून ही घरे जमीनदोस्त केली. तेव्हा महिला आणि लहान मुले अक्षरश: धायमोकलून रडत होती. ऐन उन्हाळ्यात ही आठ आदिवासी कुटुंबे रस्त्यावर आली आहेत.
पालघर जिल्ह्यात मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या महामार्गासाठी पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू व तलासरी तालुक्यातील 901 हेक्टर जागा संपादित करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण 51 गावे बाधित झाली आहेत. या गावांमधील हजारो आदिवासी तिथे पिढ्यान्पिढ्या राहतात. त्यांची वहिवाट आहे. परंतु प्रशासन जमिनीचा मोबदला देताना मूळ मालकाला हाताशी धरून आदिवासी कब्जेदारांच्या तोंडाला पाने पुसत आहे. जमिनीचा मोबदला आम्हालाही मिळावा म्हणजे आम्ही इतरत्र घरे बांधून राहू, अशी या आदिवासींची मागणी आहे.
COMMENTS