क्राईमनामा Live : 'अलीकडच्या काही काळात अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचे समोर येत आहे. पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत. हे मह...
क्राईमनामा Live : 'अलीकडच्या काही काळात अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचे समोर येत आहे. पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही.
यापुढील काळात पत्रकारांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत,' असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला.
पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यावर जाणीवपूर्वक हल्ले सुरू आहेत. ही परंपरा महाराष्ट्राला शोभणारी नाही. कोकणात पत्रकाराची हत्या झाली. मागील आठवड्यात एका पत्रकाराला मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी दम दिला. छत्रपती संभाजीमहाराज नगरमध्ये खोके यावरून रॅप साँग करणार्याला जेलमध्ये टाकण्यात आले. खोका हा उल्लेख केला, त्याला अटक करून संबंधितांनी खोक्याचे एकप्रकारे समर्थन केले आहे. एक नेता सातत्याने एचएमव्ही पत्रकार, चाय बिस्कीट पत्रकार अशी जाहीर वल्गना करीत आहे, असे त्यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकाराला शाई फेकीच्या गुन्ह्यात गोवले गेले. पत्रकारांनी एकजूट केल्यावर त्या पत्रकाराला गुन्ह्यातून वगळले गेले. महाराष्ट्रात हा प्रकार एक शोकांतिका आहे. असे प्रकार थांबले पाहिजेत. म्हातारी मेली तरी चालेल, पण काळ सोकावता कामा नये. यापुढे पत्रकारांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही पवार यांनी दिला.
COMMENTS