महात्मा फुले म्हणजे एक मराठी लेखक विचारवंत, समाज सुधारक आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते. बहुजन समाजाच्या व शेतकऱ्यांच्या समस्यांना केंद्रस्था...
महात्मा फुले म्हणजे एक मराठी लेखक विचारवंत, समाज सुधारक आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते.
बहुजन समाजाच्या व शेतकऱ्यांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी करणारे एक थोर समाज सुधारक म्हणजे महात्मा फुले. समाजाला दिशा दर्शविणारा एक युगपुरुष म्हणजे महात्मा फुले. एका गरीब कुटुंबातून पुढे येऊन समाजातून महात्मा पदवी प्राप्त करण्यापर्यंतचा त्यांचाजीवन प्रवास थक्क करणारा आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समाजकार्याचा लेखाजोखा मांडताना सर्वात अग्रक्रमाने येणारी गोष्ट म्हणजे त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले उत्तुंग असे कार्य.
"विद्येविना मती गेली
मतीविना नीती गेली,
नीतीविना गती गेली
गती विना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले."
शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या महात्मा फुले यांच्या या ओळी वर्षानुवर्षे समाजाला दिशादर्शक आहेत. विषमता दूर करण्यासाठी मागासलेल्या जातीतील मुला मुलींना व स्त्रियांना शिक्षण देण्यावर त्यांनी भर दिला. यामुळे सामाजिक भेदभाव कमी होईल असे त्यांचे निश्चित मत होते आणि म्हणूनच त्यांनी ३ ऑगस्ट १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेमध्ये भिडे वाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि त्यानंतर तब्बल १८ शाळा त्यांनी सुरू केल्या. १५ मार्च १८५२ रोजी त्यांनी वेताळ पेठेत अस्पृश्यांसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली. त्यांनी सुरू केलेल्या या शाळा म्हणजे इतिहासात एतद्देशियांनी काढलेल्या पहिल्या वहिल्या शाळा होत्या. महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाचे प्रणेते म्हणून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दांपत्याला ओळखले जाते. १८५२ साली भारतातील शिक्षण विषयक स्थापन करण्यात आलेल्या हंटर कमिशन समोर महात्मा फुलेंनी साक्ष देऊन १२ वर्षांखालील मुल- मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे शिक्षक, प्रशिक्षित असावेत, शिक्षक बहुजनातीलही असावेत, जीवन उपयोगी व्यवहारी शिक्षण द्यावे, आदिवासी जाती-जमातीतील मुलांना शिक्षणात प्राधान्य द्यावे, शेतीचे व तांत्रिक शिक्षण द्यावे, वसूल केलेल्या शेत साऱ्यांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या शिक्षणावर खर्च करावी, महाविद्यालयीन शिक्षण हे जीवनातील गरजा भागवणारे असावे अशा महत्त्वपूर्ण मागण्या त्यांनी केल्या. १८५५ साली त्यांनी प्रौढांसाठी देशातील पहिली रात्र शाळा स्थापन केली. व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना देखील केली तसेच १८७७ साली त्यांनी पुण्यातील धनकवडी येथे दुष्काळपीडीत विद्यार्थ्यांयासाठी कँम्प उभारला.
प्राथमिक शिक्षण मोफत, सार्वजनिक व सक्तीचे केले जावे, अशी मागणी करणारे महात्मा ज्योतिबा फुले हे आशिया खंडातील पहिले शिक्षण तज्ञ होय.
शिक्षणाबरोबरच जनजागृतीसाठी त्यांनी लेखन कार्यातून समाजाला एक दिशा प्रदान करून दिली तृतीय रत्न या नाटकाच्या माध्यमातून त्यांच्या लेखन कार्याला प्रारंभ झाला शेतकऱ्याचा आसूड व गुलामगिरी हे त्यांचे प्रमुख ग्रंथ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता त्यांनी शेतकऱ्याचा आसूड या त्यांच्या पुस्तकातून मांडली, तर गुलामगिरी हा त्यांनी लिहिलेला पहिला गद्यग्रंथ होय. बहुजन समाजाच्या दाहक अपमानाच्या आणि जीव घेण्या सामाजिक आणि आर्थिक दुःखाच्या हुंकारातून जन्मलेला पहिला नकार आणि विद्रोह म्हणजेच गुलामगिरी. छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्यांनी पोवाडा देखील लिहिला होता. त्याचबरोबर ब्राह्मणांचे कसब आणि सार्वजनिक सत्यधर्म ही देखिल त्यांची इतर प्रमुख पुस्तके. त्याचबरोबर अभंग, अखंड इत्यादी काव्य प्रकारातून त्यांनी आयुष्यभर काव्य लेखन केले. आपले विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी ग्रंथ रूपाने आणि स्फुटलेखनाने विपुल वांङमय निर्मिती केली.
महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर इसवी सन १८९१ मध्ये प्रकाशित झालेला सार्वजनिक सत्य धर्म हा फुलेंचा शेवटचा ग्रंथ. तत्त्वज्ञान म्हणून त्यांचे थोर पण या ग्रंथातून लक्षात येते. सत्यमेव जयते हे बीज सूत्र घेऊन साकारलेला हा ग्रंथ सत्यावर आधारलेल्या नव्या सर्व समावेशक धर्माच्या तत्त्वज्ञानाची मांडणी करणारा ग्रंथ आहे.
भारतात प्रचलित असलेली धर्म संस्था, त्यावर आधारित समाज रचना आणि एका विशिष्ट जातीचे या क्षेत्रातील वर्चस्व यामुळे शेतकऱ्यांचे, दलितांचे होणारे शोषण, त्यांची दयनीय स्थिती ही सारी परिस्थिती बदलण्यासाठी आमुलाग्र सामाजिक क्रांती झाली पाहिजे अशी ज्योतिरावांच्या मनाची खात्री झाली होती आणि आपल्या वैयक्तिक अनुभवावर त्यांनी आपली विचारधारा बनवली होती. २४सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करून तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी प्रचंड मोठे समाजकार्य केले. समाजातील तळागाळातील लोकांसाठी ते आयुष्यभर झटत राहिले. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून महात्मा फुलेंची ओळख अजरामर आहे. सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी दलित आणि अन्य शोषित वर्गांना ज्ञानाच्या मार्गावर आणणे आणि स्त्रियांना त्यांच्या सामाजिक दास्यातून मुक्त करणे गरजेचे आहे हे त्यांनी जाणले होते. त्यासाठी शिक्षण हाच एकमेव पर्याय आहे हे देखील त्यांनी ओळखले होते.
समाजातील अनिष्ठ चाली रीती, रूढी - परंपरा यांना मूठ माती दिल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही हा विचार महात्मा फुलेंनी समाजाला दिला. स्त्रियांसाठी त्यांनी केलेले सामाजिक कार्य हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पूर्वी रुढीनुसार मुलींचे लहान वयातच लग्न केले जात होते, त्यामुळे अनेक स्त्रियांना वैधव्याला तोंड द्यावे लागे. पतीच्या चितेवर स्वतःला झोकून सती जावे लागत होते. पुनर्विवाह निषि:द्ध मानला जात होता. स्त्रियांवर अत्याचारही होत असत. केशवपन ही देखील स्त्रियांवर अन्याय व अत्याचार करणारी रूढी. पतीच्या मालमत्तेवर तिचा अधिकार नव्हता स्त्रियांना शिक्षण घेता येत नव्हते अशा विदारक असणाऱ्या परिस्थितीमध्ये महात्मा फुलेंनी स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली त्यानंतर तब्बल १८ शाळा सुरू केल्या व त्या अत्यंत व्यवस्थितरित्या पुढे चालविल्या. विधवा पुनर्विवाहला जनतेचा पाठिंबा मिळावा म्हणून १८५३ मध्ये एक सभा भरविण्यात आली होती. सुधारकांना विरोध करण्यासाठी सनातनी शास्त्री मंडळीही मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. त्यांनी वादविवाद करून ती सभा उधळून लावली. परंतु पुढे ज्योतिराव फुले आणि अन्य सुधारकांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केल्याने १८५६ साली सरकारने विधवा पुनर्विवाहाचा कायदा संमत केला. त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. स्त्रियांना संरक्षण देणारे अशा तऱ्हेची बालहत्या प्रतिबंधक संस्था भारतात सर्वप्रथम ज्योतिरावांनी सुरू केली, हे त्यांच्या दूरदर्शीपणाचे द्योतक आहे. काशीबाई नावाच्या एका विधवेच्या बाळंतपणाची सोय करून तिच्या पोटी जे पुत्ररत्न जन्माला आले ते त्यांनी दत्तक घेतले. त्याचे उत्तम प्रकारे पालन पोषण करून त्याला डॉक्टर बनविले आणि आपल्या मृत्युपत्राद्वारे त्याला आपला वारसही ठरविले. विधवा स्त्रियांवर अन्याय करणारी केशवपन ही रुढी बंद करावी ही ज्योतिरावांची मनीषा होती या कार्याला चालना देण्यासाठी ज्योतिरावांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तळेगाव ढमढेरे व ओतूर येथे न्हावी लोकांचा संपही घडवून आणला. स्त्रियांचे शिक्षण व स्त्रियांवर अन्यायकारक असणाऱ्या चालीरीती रुढी व सामाजिक दास्यत्व यांच्यापासून स्त्रियांची मुक्तता व त्यांचे मानवी हक्क यासाठी समाजातील सर्व जातीतील स्त्रियांसाठी ज्योतिरावांनी केलेले कार्य यासाठी स्त्रियांचा पहिला उद्धार कर्ता म्हणून ज्योतिरावांचे नाव सदैव घेतले जाईल.आज समाजामध्ये स्त्रियांची जी प्रगती आपण पाहतो त्यामागे महात्मा ज्योतिबा फुले यांचे योगदान हे अजरामर आहे.
नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे असे ज्योतिबांचे मत होते.
तळागाळातील बहुजनांच्या उद्धारासाठी अहोरात्र झटणाऱ्या, स्त्रियांचा व मागासलेल्या जाती - जमातीतील लोकांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी व त्यांच्या शिक्षणासाठी सदैव प्रयत्न करणाऱ्या अशा या महापुरुषाला त्यांच्या जयंती दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम
एका सत्यशोधक समाजसुधारकाला विनम्र अभिवादन
- प्रा. गणेश रोकडे
श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर.
७७०९०३६४५८
COMMENTS