सिंधुदुर्ग : आंबोली घाटात दरीत पडून मृत्यू झाल्याच्या घटनेला वेगळेच वळण लागले आहे. पैसे दिले नाहीत म्हणून मारहाण करताना एकाचा मृत्यू झाला. त...
सिंधुदुर्ग : आंबोली घाटात दरीत पडून मृत्यू झाल्याच्या घटनेला वेगळेच वळण लागले आहे. पैसे दिले नाहीत म्हणून मारहाण करताना एकाचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह दरीत टाकण्यासाठी आपल्या मित्रासोबत आलेल्या विटाभट्टी व्यावसायिकाचाही दरीत पडून मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.
यावेळी मागे एकटा राहिलेला आरोपी घाबरल्याने त्याने स्वतःच पोलिसांनी ही घटना सांगितल्यामुळे हे सर्व प्रकरण समोर आले आहे.
भाऊसो अरूण माने (वय 30, रा. कराड) याचा विटाचा व्यवसाय होता. सुशांत आप्पासो खिलारे (वय 35 रा. कासेगाव पंढरपूर) याने आपण कामगार पुरवतो, असे सांगून एक ते तीन लाख रूपये आगाऊ घेतले होते. पण, कामगार पुरवले नाहीत आणि पैसेही परत केले नाहीत. यावेळी भाऊसो माने याने पैशाचा तगादा लावला. पण सुशांत खिलारे यांनी पैसा देण्यास टाळाटाळ केली. भाऊसो माने यांनी सुशांत खिलारे याला गाडीत घालून किणी टोल नाक्याजवळ आणून मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी त्याच्या सोबत आरोपी तुषार पवार (वय ३०, रा. कराड) हा पण मारहाण करत होता. या मारहाणीच्या भितीने सुशांत खिलारे याचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
भाऊसो माने व तुषार पवार यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रात्रीच्या सुमारास आंबोलीत आले. आंबोलीत मुख्य धबधब्यापासून काही अंतरावर हा मृतदेह फेकताना पुढे असलेल्या भाऊसो मानेचा तोल गेला आणि तो सुशांत खिलारेच्या मृतदेहासोबत दरीत पडला. यानंतर त्याच ठिकाणी आरोपी तुषार पवार हा आणलेल्या गाडीत रात्री अकरापर्यंत बसून राहिला. अखेर भीतीने त्याने घडला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS