औरंगाबाद : तीन महिन्यापुर्वी प्रेमविवाह केलेल्या युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ह्दयद्रावक घटना सोमवारी (ता. २०) दुपारी २...
औरंगाबाद : तीन महिन्यापुर्वी प्रेमविवाह केलेल्या युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ह्दयद्रावक घटना सोमवारी (ता. २०) दुपारी २ वाजेच्या सुमारास बजाजनगरात घडली आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
अंजली बिरेंद्रसिंग गौतम (वय २१, रा. कानपुर, उत्तरप्रदेश, ह.मु.बजाजनगर) असे मृत युवतीचे नाव आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने अंजलीने दहावीनंतर बजाजनगरातील एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये नोकरी करत होती. अंजलीची काही दिवसांपूर्वी रोहित कारभारी आव्हाड (वय २२, रा.बजाजनगर) या युवकासोबत मैत्री झाली आणि मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले होते. पुढे दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.
प्रेमविवाहाला दोन्ही कुटुंबियाकडून विरोध होण्याची शक्यता असल्याने दोघांनी घरातून पळून जात पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे ९ नोव्हेंबर २०२२ रोजी लग्न केले होते. घरी परतल्यानंतर या नवीन जोडप्याने सुखी संसाराचे स्वप्न रंगविण्यास सुरुवात केली. पण, प्रेमविवाहानंतर काही दिवसांतच रोहित व अजंली यांच्यात वाद सुरु झाले. पती व सासरकडील मंडळीत कुरबुरी सुरु झाल्यानंतर अंजलीने या प्रकाराची माहिती आईला दिली होती. काही दिवसांपूर्वी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे गाठून अंजलीने पती व सासरच्या मंडळी विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी अंजली व रोहित यांचे नातेवाईकांसह समुपदेशन केले. मात्र, समुपदेशानंतर अंजली ही सासरी न जाता बजाजनगरात आईकडे गेली होती.
आईच्या घरी अंजली ही शांत राहात होती. आई गिता या कंपनीत कामासाठी गेल्यानंतर अंजली घरी एकटीच होती. कंपनीत गेल्यानंतर गिता यांनी अजंली हिच्या मोबाईलवर सतत संपर्क करुनही ती प्रतिसाद देत नव्हती. अखेर त्यांनी शेजाऱ्यांना माहिती दिली. शेजाऱ्यांनी घरात डोकावून पहिले असता अंजलीने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. गीता यांनी लागलीच घर गाठले. मुलीचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. पती रोहित व सासरच्या मंडळीच्या छळामुळे तिने आत्महत्या केल्याचा आरोप करीत दोषीविरुध्द कडक कारवाई करण्याची मागणी गीता यांनी केली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS