सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ गुरुकुल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ गुरुकुल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नुकताच बाल आनंद मेळावा बाजाराच्या माध्यमातून संपन्न झाला.
"भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी" ही हाक ऐकली आणि क्षणार्धात आठवण झाली ती बाजाराची.आज समर्थ गुरुकुल मधील चिमुकल्यांनी एक मोठा बाजार भरवला होता. या बाजाराला जत्रेचेच स्वरूप आले होते. जत्रा म्हणजे सर्वांच्या जिव्हाळ्याचा व आपुलकीचा विषय. भेळ, पाणीपुरी, वडापाव, सरबत, ऊसळ, पॅटीस, समोसे, फ़ुगे, भाज्या इ.चे स्टॉल लावतात. पालकसुध्दा त्यांना मदत करतात. शिवाय गुंतवलेल्या भांडवला पेक्षा दुप्पट फायदा त्याना होतो. हिशोब शिकतात. सर्वांना संधी मिळते, व्यवसायाभिमुख शिक्षण, मनोरंजकता येते. संभाषणकला, आनंदायी वातावरण शाळेत येऊन जत्रेचा अनुभव, शिवाय बक्षिस मिळते. विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरील आनंद व आत्मविश्वास पाहून मान्यवरांनी खूप समाधान व्यक्त केले.
या बाल आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खरेदी-विक्री व्यवहाराची माहिती व सखोल व्यावहारिक ज्ञानाची शिदोरी मिळत असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल ताई शेळके म्हणाल्या.
या वेळी विद्यार्थ्यांनी मेथी, पालक, शेपू, टोमॅटो, बटाटा, कांदे, शेवगा, इ.भाज्यांचे, चिकू, द्राक्षे, केळी इ.फळांचे, दैनंदिन वापरातील वस्तू, गहू, बाजरी, ज्वारी, हुलगे, मटकी, मूग, हरभरा, मक्याची कणसे, मुळा, बिट, गाजर, कपडे, खेळणी, छोटी छोटी भांडी, गुलाबजामुन, भेळ, ताक, भजी, खारे शेंगदाणे, विविध रंगांचे फुटाणे, कुटुंबासाठी आवश्यक सर्वच गोष्टींचा समावेश या बाजारात करण्यात आला होता. आपल्याकडे असलेली भाजी इतरांना विकताना या बालचमुंमधील व्यवहारचातुर्य, ग्राहक घासाघीस करताना, वस्तूची असलेली किंमत आणि त्यासाठी लागणारा खर्च पटवून देतानाचे विद्यार्थ्यांचे कौशल्य दिसून आले. बाजार सरतेवेळी भाज्यांचे दर कमी होतील म्हणून काही विद्यार्थ्यांनी पूर्वनियोजितच प्रचार आणि जाहिरात सुरुवातीपासूनच मोठ्या आवाजाने हाक मारत सुरू केलेली होती. भाज्या खराब होऊ नयेत म्हणून त्यावर पाणी मारून पोत्यांचे आवरण केले होते.
संकुलातील सर्वच शिक्षकांना एका अनोख्या बाजाराचे दर्शन या वेळी पहावयास मिळाले. कधी जिभेचे चोचले न पुरवणाऱ्यांनाही आज मोह आवरला नाही. बाजारात असलेले खमंग भजी चवीने खात अर्ध्या तासात भज्यांचा स्टॉल फस्त केला. ताक आणि थंड पेयाच्या स्टॉल वर तसेच द्राक्ष स्टॉल वर तर पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त म्हणून भाव ही कमालीचा वाढवण्यात आला. यावेळी मागणी तसा पुरवठा या तत्वाचे धडेही विद्यार्थ्यांना घ्यायला मिळाले.
या बाजारातून सुमारे ५५ हजारांची उलाढाल झाल्याचे प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी सांगितले. यावेळी संकुलातील शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी पुरेपूर आस्वाद घेतला. या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात व्यवहारज्ञान समृद्ध होण्यास नक्कीच फायदा होईल असे संस्थेच्या संचालिका सारिका ताई शेळके यांनी यावेळी सांगितले. या बाजाराला भेट देत संस्थेचे अध्यक्ष वसंतरावजी शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, प्राचार्य सतीश कुऱ्हे तसेच सर्व संस्थांचे प्राचार्य, विभागप्रमुख व शिक्षकांनी बालचमुंच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. सदर बाजाराचे यशस्वी नियोजन करण्यासाठी प्राचार्य सतीश कुऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिष पायमोडे, सचिन शिंदे, किरण वाघ,शितल शिंदे, प्रिया कडूसकर, विनोद गागरे, प्रविण औटी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर वर्ग यांनी सहकार्य केले.
COMMENTS