सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : पुणे जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती जुन्नर (शिक्षण विभाग) व जुन्नर तालुका विज्ञान अ...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : पुणे जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती जुन्नर (शिक्षण विभाग) व जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघ आणि समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे समर्थ पॉलीटेक्निक बेल्हे (बांगरवाडी) यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन व मेळावा सन २०२२-२३ समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे दि २९ व ३० डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये संपन्न होणार असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी संचिता अभंग यांनी दिली.
शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना विज्ञानविषयक गोडी निर्माण व्हावी तसेच त्यांची जिज्ञासू वृत्ती,निरीक्षण क्षमता,प्रयोगशिलता,तांत्रिक कौशल्य वृद्धिंगत व्हावे आणि समाजाभिमुख प्रकल्प वाढावेत यासाठी हे प्रदर्शन महत्वाचे असल्याचे जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघांचे अध्यक्ष रतिलाल बाबेल यांनी सांगितले.
प्रदर्शनाचा मुख्य विषय तंत्रज्ञान आणि खेळणी असा असून माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानातील प्रगती, पर्यावरणास अनुकूल सामग्री,आरोग्य आणि स्वच्छता,वाहतूक आणि नवोपक्रम,पर्यावरणीय चिंता,वर्तमान नवोपक्रमासह विकास आणि आमच्यासाठी गणित असे उपविषय ठरवण्यात आलेले आहेत.उपरोक्त विषया पैकी कोणत्याही एका उपविषयावर आधारित निम्न प्राथमिक स्तर(इ.१ ली ते ५वी),प्राथमिक स्तर(इ.६ वी ते ८ वी) आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरापर्यंतच्या (९ ते १२ वी ) शालेय विद्यार्थी व शिक्षक प्रदर्शनीय वस्तू, प्रतिकृती,वैज्ञानिक प्रकल्प तयार करून विज्ञान प्रदर्शनात सादर करण्यात येणार आहेत.
या दोन दिवसीय प्रदर्शनामध्ये प्रकल्प स्पर्धेसोबतच संगणकीय सादरीकरण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, भित्तिपत्रक (पोस्टर मेकिंग) स्पर्धा,विज्ञान प्रश्नमंजुषा, कौन बनेगा विज्ञानपती स्पर्धा आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे
आगस्त्या फाऊंडेशन,आयुका द्वारे दिवसभर विज्ञानवाहिनी मार्फत विज्ञान खेळणी प्रात्यक्षिक आणि सायंकाळी दुर्बीनी द्वारे अवकाश दर्शन देखील दाखविण्यात येणार आहे.
हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून यामध्ये दुर्मिळ नाणे व शस्त्रास्त्रे, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई यांचे वतीने मोबाईल म्युझियम ऑन व्हील्स बस, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन, अंधश्रद्धा निर्मूलनपर जादूचे प्रयोग,न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड चे माहितीपर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे.
संवाद विज्ञान लेखकांशी, गणितीय गमती-जमती व गप्पा गणित संशोधकांशी या विषयांवर आधारित तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शनपर व्याख्यान देखील होणार आहे.
सदर प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या वतीने आयोजक वल्लभ शेळके यांनी केले आहे.
COMMENTS