जळगावः शेतात बैल शिरल्याच्या कारणावरुन काका-पुतण्यामध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत पुतण्याचा मृत्यू झाल्याची घटना पाचोरा तालुक्यातील वाडी ...
जळगावः शेतात बैल शिरल्याच्या कारणावरुन काका-पुतण्यामध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत पुतण्याचा मृत्यू झाल्याची घटना पाचोरा तालुक्यातील वाडी (शेवाळे) येथे घडली आहे.
पुनमचंद भोसले (वय 43) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. हाणामारीची घटना ही 27 नोव्हेंबरला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. यांनतर पुनमचंद भोसले यांच्यावर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र, बुधुवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
बैल शेतात शिरल्याचा राग आल्यानं प्रल्हाद मोतीराम भोसले यांनी पुतण्या पुनमचंद भोसले यांना काठीने मारहाण केली. या मारहाणीत पुनमचंद भोसले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर पुनमचंद भोसले यांना जळगावमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी प्रल्हाद मोतीराम भोसले यांना अटक केली आहे.
पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रल्हाद मोतीराम भोसले आणि त्यांचा पुतण्या पुनमचंद भोसले यांची वाडी (शेवाळे) येथे शेत जमीन शेजारी-शेजारी आहे. पुनमचंद भाऊराव भोसले यांचा मुलगा किरण पुनमचंद भोसले यांची बैलजोडी 27 नोव्हेंबरला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास प्रल्हाद मोतीराम भोसले यांच्या शेतात शिरली होती. याचा राग आल्याने प्रल्हाद भोसले आणि त्यांचा मुलगा गणेश भोसले यांनी किरण पुनमचंद भोसले यांच्यासह पुनमचंद भोसले यांनी काठीने मारहाण केली. या मारहाणीत पुनमचंद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी किरण पुनमचंद भोसले यांनी चुलत आजोबा प्रल्हाद मोतीराम भोसले आणि गणेश भोसले यांच्याविरुध्द 27 नोव्हेंबर रोजी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS