भोपाळ (मध्य प्रदेश): लिव्ह इन रिलेशनमध्ये असलेल्या श्रद्धा वालकरची तिचा मित्र आफताब पूनावाला याने हत्या करून मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची घटन...
भोपाळ (मध्य प्रदेश): लिव्ह इन रिलेशनमध्ये असलेल्या श्रद्धा वालकरची तिचा मित्र आफताब पूनावाला याने हत्या करून मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची घटना ताजी असतानाच मध्य प्रदेशातही असाच प्रकार उघडकीस आला आहे.
बहिणीशी प्रेमसंबंध असल्यावरून एकाने व्यावसायिक भागीदाराची हत्या करून मृतदेहाचे ८० तुकडे करून ते रिवा जिल्ह्यातील दूधमतिया जंगलात फेकून दिल्याची माहिती पुढे आली आहे.
विकास गिरी व युनुस अन्सारी हे व्यावसायिक भागीदार होते. एक वर्षभरापूर्वी विकास काही कामासाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र, तो परतला नाही. तो बेपत्ता झाल्यानंतर चार महिन्यांनी दूधमतिया जंगलात मानवी मृतदेहाचे अवशेष आढळले होते. रिवा जिल्ह्यातील मौगंज पोलिसांनी अधिक शोध घेऊन जंगलात एकूण ८० हाडे हस्तगत केली होती. हे मानवी अवशेष विकासचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला होता.
पोलिसांनी विकासचे मित्र, कुटुंबीय व नातेवाइकांकडून माहिती घेतली आणि खुनाचे गूढ उकलले. पोलिसांनी युनुसला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. विकास व अन्सारी हे व्यावसायिक भागीदार होते. दोघे वन विभागाकडून वृक्षारोपणाचे ठेके घेत असत. विकासचे युनुसच्या घरी येणे-जाणे होते. युनुसला तीन बहिणी आहेत. त्यांच्यापैकी एकीशी विकासचे कथितरीत्या प्रेमसंबंध होते. ही बाब समोर आल्यानंतर अन्सारी कुटुंबीय संतप्त झाले होते. यानंतर आरोपीने मेहुण्यासोबत मिळून विकासचा खून केला. बहिणीचा विनयभंग केल्याबद्दल विकासचा आपण ३ ऑक्टोबर २०२१ च्या रात्री चाकूने भोसकून खून केला, अशी कबुली युनुसने दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS