नाशिक : दिवाळीनिमित्त माहेरी निघालेल्या महिला वर्गाच्या वर्दळीने शहर परीसरातील बसस्थानके गजबजले होते. मंगळवारी (ता.२५) माहेरवाशीनींची लक...
नाशिक : दिवाळीनिमित्त माहेरी निघालेल्या महिला वर्गाच्या वर्दळीने शहर परीसरातील बसस्थानके गजबजले होते. मंगळवारी (ता.२५) माहेरवाशीनींची लक्षणीय गर्दी बघायला मिळाली.
विशेषतः खानदेशात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय होती. संख्या लक्षात घेता, एसटी महामंडळातर्फे जादा बसगाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या.
दिवाळीच्या हंगामानिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे जादा बस गाड्यांचे नियोजन केले आहे. बुधवारी (ता.२६) भाऊबीज असल्याने लाडक्या भाऊरायाच्या भेटीसाठी महिला वर्ग माहेरी रवाना झाले. यामुळे प्रवाशांमध्ये महिला वर्गाची संख्या लक्षणीय राहिली. बहुतांश महिलांसोबत चिमुकलेदेखील मामाच्या गावी निघाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह बघायला मिळत होता.
शहरातील नवीन सीबीएस बसस्थानकातून पुणे, औरंगाबाद, धुळे यांसह निफाड, येवला आदी ठिकाणांसाठी बसगाड्या सोडण्यात आल्या. तर जुने सीबीएस बसस्थानकातून सटाणा, कळवण, देवळा आदी भागांसाठी बसगाड्या सोडण्यात येत होत्या. महामार्ग बसस्थानकातून मुंबईसह अन्य मार्गांसाठी बस सुटल्या. मंगळवारी सकाळच्या वेळी बसस्थानकांवर तुफान गर्दी झाली होती. दुपारी तप्त उन्हामुळे गर्दीत काही प्रमाणात घट झाली. व पुन्हा सायंकाळी बसस्थानके प्रवाशांनी गजबजली होती. प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी बसस्थानक परिसरात ठाण मांडून होते.
तिकिटासाठी रांगा, ऑनलाइन आरक्षणालाही प्रतिसाद
प्रवास सुखकर करण्यासाठी अनेक प्रवाशांनी आरक्षण करण्यावर भर दिला. ऑनलाइन माध्यमातून आरक्षण करण्यात येत होते. तर विनावाहक बसगाड्यांसाठी बसस्थानकावरील खिडकीवर तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशांची रांग लागलेली बघायला मिळाली.
एजंटांचा सुळसुळाट
बसस्थानकाच्या आवारात खासगी ट्रॅव्हल्सच्या एजंटाकडून प्रवासी पळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बघायला मिळाले. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे संबंधित एजंट बसस्थानकात थेट येण्याऐवजी आवारातून प्रवाशांना गळ घालत असल्याचे बघायला मिळाले.
COMMENTS