किनवट (नांदेड): दाढी करण्यासाठी सलूनमध्ये गेलेल्या युवकासोबत भांडण झाल्यानंतर सलून चालकाने वस्तऱ्यानेच त्याच्या गळ्यावर वार केला. यामुळे य...
किनवट (नांदेड): दाढी करण्यासाठी सलूनमध्ये गेलेल्या युवकासोबत भांडण झाल्यानंतर सलून चालकाने वस्तऱ्यानेच त्याच्या गळ्यावर वार केला. यामुळे युवक मृत्युमुखी पडला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने सलून चालकाला बेदम मारहाण केली यामध्ये त्याचाही मृत्यू झाला आहे.
बोधडी बुद्रुक (ता. किनवट) येथे गुरुवारी सायंकाळी ही घडली आहे.
व्यंकटी सुरेश देवकर (वय २२) हा गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अनिल मारोती शिंदे (वय ३२) याच्या हेअर सलूनमध्ये दाढी करण्यासाठी गेला होता. तेव्हा काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. यानंतर अनिल शिंदे याने दाढी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तऱ्याने व्यंकटी देवकर याच्या गळ्यावर वार केला व तो पसार झाला. गंभीर जखमी झालेला व्यंकटी देवकर जीव वाचविण्यासाठी गळ्याला रुमाल धरत तेथून लगेच निघाला आणि ५० फूट चालत जाऊन कोसळला. अतिरक्तस्राव झाल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला.
व्यंकटीच्या खुनाच्या घटनेमुळे येथे जमलेले गावातील नागरिक संतप्त झाले. त्यांनी मारेकरी अनिल शिंदे याचा शोध घेतला. तो नाल्याच्या काठी एका झुडपात लपून बसला होता. जमावाने त्यास शोधून काढले आणि मारहाण करत मार्केटमध्ये आणले. पुन्हा बेदम मारहाण केली. या मारहाणीत अनिलही ठार झाला आहे. दोन्ही घटनांबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS