वेंगुर्ले (सिंधुदुर्ग): सायली यशवंत गावडे (वय २०, रा. मठ-कणकेवाडी) या युवतीचा मृतदेह आडेली-वेतोरे हद्दीतील सीमेवरील एका बागेत आढळून आल्यान...
वेंगुर्ले (सिंधुदुर्ग): सायली यशवंत गावडे (वय २०, रा. मठ-कणकेवाडी) या युवतीचा मृतदेह आडेली-वेतोरे हद्दीतील सीमेवरील एका बागेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तिच्या जवळच्या मैत्रिणीचा नवरा परुळे येथील गोविंद उर्फ वैभव दाजी माधव याने ओढणीने तिचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली आहे.
सायलीने प्रेमसंबंध नाकारल्याने हा खून केला असावा असा प्राथमिक संशय आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली.
कुडाळ येथे एका खासगी रुग्णालयात कामानिमित्त जाणारी सायली शनिवारी (ता. २७) सायंकाळपासून बेपत्ता होती. यामुळे तिचे वडील यशवंत लवू गावडे यांनी २८ ऑगस्ट रोजी सकाळी ती बेपत्ता असल्याची खबर वेंगुर्ला पोलिसात दिली होती. दरम्यान, रविवारी रात्री ११.३० च्या सुमारास काजूच्या बागेत वेतोरेतील एका युवकाला तिचा मृतदेह निदर्शनास आला होता. यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला होता.
सायलीच्या डोक्याच्या पाठीमागे दुखापत झाली होती तर तोंडावर मारहाणीचे निशाण होते व नाकातून रक्त येत होते. तसेच तिच्या गळयाभोवती काळा व्रण दिसून आला असल्याने तिचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. यानंतर हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला होता.
प्रेमसंबंध नाकारल्याने...
यावेळी कुटुंबियांनी पोलिसांना दिलेल्या महितीनुसार, गोविंद माधव सहित ४ संशयिताना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. यावेळी सायली हिने प्रेमसंबंध नाकारल्याने तिच्याच ओढणीने तिचा गळा आवळून व हाताने मारहाण करून गोविंद माधव यानेच तिचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, असे पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी सांगितले.
COMMENTS