पुणे: शिरुर शहरातील प्रसिद्ध ज्वेलर्स व्यापारी वैभव खाबिया यांना एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अज्ञाताकडून धमकीचा फोन आल्याने शिरूर शहरात ख...
पुणे: शिरुर शहरातील प्रसिद्ध ज्वेलर्स व्यापारी वैभव खाबिया यांना एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अज्ञाताकडून धमकीचा फोन आल्याने शिरूर शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वैभव दिलीप खाबिया (वय ४६, रा.नवीन नगरपालिकेसमोर पाबळ फाटा, शिरूर) यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
शिरूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैभव खाबिया यांचे शिरूर येथे ज्वेलर्सचे दुकान आहे. सोमवारी (ता. ४) सकाळी ११:१८ वाजता खाबिया यांच्या दुकानात ते असताना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने फोन व टेक्स्ट मेसेज करून 'मी डी. के. ग्रुपमधुन बोलतोय, तू मला खंडणी म्हणून १ कोटी रुपये दिले नाही तर मी तुझा व तुझ्या कुटुंबाचा गेम वाजवणार, तुला जिवंत सोडणार नाही,' असे म्हणून खंडणी मागितली. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे करत आहेत.
खंडनीच्या धमकीमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. शिरूर शहर हे व्यापारी गाव आहे. शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत शेतकऱ्यांच्या विदयुत मोटारींची चोरी सुरुच असून टु -व्हीलर गाडी चोरी, कृषी केंद्र व मेडीकल यांचे शटर उचकटून यामधील रोख रक्कम लुटणे आदी प्रकाराला आळा घालणे शिरूर पोलिस स्टेशनला अवघड बनले आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरीकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. विदयुत मोटारीचा छडा त्वरीत न लागल्यास गाव बंद करण्याचा इशारा आमदाबाद ग्रामस्थांनी दिला आहे.
COMMENTS