रांची (झारखंड): राज्यातील खूंटी जिल्ह्यात इंटर्नशिपसाठी आलेल्या आयआयटीच्या विद्यार्थिनीचा एका आयएएस अधिकाऱ्याने चुंबन घेऊन विनयभंग केल्याची ...
रांची (झारखंड): राज्यातील खूंटी जिल्ह्यात इंटर्नशिपसाठी आलेल्या आयआयटीच्या विद्यार्थिनीचा एका आयएएस अधिकाऱ्याने चुंबन घेऊन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी उपविभागीय दंडाधिकारी सैयद रियाज अहमद याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
खूंटीचे पोलिस अधीक्षक अमन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, खुंटी जिल्ह्यातील एसडीएम आणि 2019 बॅच आयएएस अधिकारी सय्यद रियाझ अहमद यांना हिमाचल प्रदेशातील आयआयटीमधून इंटर्नशिपसाठी येथे आलेल्या एका विद्यार्थिनीशी त्यांच्या निवासस्थानी विनयभंग आणि गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास केला जात आहे. या अधिकाऱ्याने शनिवारी (ता. 2) विद्यार्थिनीचे चुंबन घेतले आणि त्याच्या राहत्या घरी या मुलीसोबत असभ्य वर्तन केल्याची तक्रार आहे.
पीडित विद्यार्थिनीने सांगितले की, इंटर्नशिप कार्यक्रमानिमित्त खुंटी येथे आलेल्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांना एसडीएम रियाझ अहमद याने 1 जुलै रोजी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी एका पार्टीसाठी आमंत्रित केले होते. पार्टी रात्रभर चालली. पार्टीनंतर सहकारी विद्यार्थ्यांसोबत 2 जुलैला सकाळी निघणार असताना संधी साधून आयएएस अधिकाऱ्याने अश्लिल कृत्य केले.
दरम्यान, पीडित मुलीने या घटनेची माहिती स्थानिक महिला पोलिस ठाण्यात दिली. मात्र, सोमवारी संध्याकाळी तिच्या वक्तव्यावरून एसडीएमविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा आरोपी रियाझ अहमदला पोलिसांनी ताब्यात घेतले. एसडीएम रियाझ अहमद यांच्या विरोधात महिला पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम 354 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
COMMENTS